नागरिकांनी ‘लॉकडाऊन’ला गांभिर्याने घेतलेले नाही, तर कठोर ‘लॉकडाऊन’ लागू करणार – अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

नांदेड – जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांमध्ये अडचण होऊ नये, म्हणून यंदाच्या टाळेबंदीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काहीअंशी शिथिलता दिली आहे. पण दुर्दैवाने रस्त्यावरील गर्दी फारशी कमी होताना दिसत नाही. नागरिकांनी ‘लॉकडाऊन’ला गांभिर्याने घेतलेले नाही. तर कठोर ‘लॉकडाऊन’ लागू करण्याशिवाय राज्य सरकारकडे इलाज राहणार नाही, असा इशाराही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी लाखो अनुयायांनी त्यांना घरुनच अभिवादन केले. त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील काळात रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, ईद आदी सण तसेच उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती  तसेच पुण्यतिथीला सुद्धा नागरिकांनी गर्दी करु नये. घरी राहूनच आपली श्रद्धा तसेच भावना व्यक्त करावी, अशी विनंती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. परंतू कोराेना रुग्णवाढीचा वेग कमी झाला नाही, तर साऱ्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडण्याची भीती या वेळी चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करायचे असेल तर सध्यातरी  ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन हाच पर्याय आहे. अन्यथा संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडणार आहे. तसेच  कठोर ‘लॉकडाऊन’ शिवाय उपाय राहणार नसल्याचे या वेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. रविवारी सकाळी समाजमाध्यमांवरुन जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी लोहा तालुक्यात कोरोना रुग्णाच्या मृत्युनंतर त्याच्या पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या करण्याच्या घटनेचा संदर्भ देत कोरोनामुळे समाजमनावर मोठा आघात झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या घटनेवरुन कोरोना रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबाची मानसिक स्थिती कशी असेल, याची कल्पना नक्कीच येते. मी आणि माझे कुटूंब या प्रसंगातून गेलेलो आहोत. विरोधकांवरही कधी अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, असे सांगून परिस्थिती चिंताजनक आहे. तरीही सर्वांनी मिळून धैर्याने त्याचा मुकाबला करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी समाजमाध्यमावर बोलताना सांगितले. तसेच  कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –