राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ‘ढगफुटी’; जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले

पाऊस

औरंगाबाद –  औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात काल सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. मात्र, संध्याकाळ नंतर झालेल्या पावसाने औरंगाबाद  जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास पावसाने रौद्र रुप धारण केले होते. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

या संदर्भात एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की,’०७:१२ वाजण्याच्या दरम्यान पावसाने अतिशय रौद्र रूप धारण केले व ०८:१० या एका तासाच्या कालावधीत ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनीटाच्या काळात (०७:४० पर्यंत) पाऊस पड़ण्याचा सरासरी वेग हा १६६.७५ मीमी नोंदवला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत ५६.२ मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच औरंगाबाद शहरावर ढगफुटी पेक्षा जास्त वेगाने पावसाने झोडपून काढले.’जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. गौताळा परिसरात दरड कोसळल्यामुळे महामार्ग बंद झाला आहे.