जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री  

सांगली : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं तसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.

जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.

राज्याचा ५० टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता. या दुष्काळग्रस्त भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या धरणांच्या बरोबरीने जलसंधारणाच्या प्रणालीद्वारे ही गावे दुष्काळमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होऊ लागले. राजकारण, गट-तट बाजूला सारुन लोक पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजावून घेऊन गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला असल्याचे त्यांनी म्हंटले.