सहकार क्षेत्रातील बँकांनी आधुनिकीकरण स्वीकारावे – जयंत पाटील

जयंत पाटील

सांगली – सहकार हा ग्रामीण विकासाचा पाया आहे. यामध्ये सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे, परंतु खाजगी व सरकारी बँकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सहकारी बँकांनी आधुनिकीकरण स्वीकारावे, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

नेर्ले तालुका – वाळवा येथील इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक  इस्लामपूरच्या नेर्ले शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व शाखा स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, वाळवा प्रांताधिकारी संपत खिलारी, वाळवाचे तहसीलदार रवींद्र सबनीस, कृष्णा साखर कारखाना कराडचे अध्यक्ष सुरेश भोसले, देवराज पाटील, सरपंच छाया कांबळे, बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सभासद यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, रिझर्व बँकेचे धोरण, खासगी बँकांकडून देण्यात येणारी सेवा या स्पर्धात्मक युगामध्ये सहकारी बँकांनी बँकिंग क्षेत्रात आलेले अत्याधुनिक यंत्रनांचा स्वीकार करायला हवा. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तरच या बँका स्पर्धेत टिकतील. आता ई -प्लॅटफॉर्मची व्यवस्था निर्माण होत आहे. त्यामुळे बँकिंगची सेवा ही बदलत आहे. त्यामुळे बँकांनी सतर्क राहून त्याप्रमाणे आपल्या सेवांमध्ये बदल करायला हवा.

कोरोनामुळे व्यवसाय पद्धतीमध्ये बदल झाला आहे. आता नव्या पद्धतीने व्यवसाय व रोजगार निर्मिती करावी लागणार आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,  कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये शंभर बेडचे अतिशय अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. तरीही जनतेने काळजी घ्यावी, नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मदत करण्याच्या भावनेतून या सहकारी बँकेची वाटचाल सुरू आहे. ती कौतुकास्पद आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामध्ये सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संस्था यांच्यामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक शैक्षणिक विकास झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –