अहमदनगर/प्रशांत झावरे :- अहमदनगर शहरातील सीना नदीतील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोहीम हाती घेतली असून त्यांनी आत्ताच सीना नदीतील अतिक्रमनांची पाहणी करून अतिक्रमण धारकांना नोटिसा बजाविण्यास संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. नोटिसा दिल्यानंतर सात दिवसात स्वतःहून अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे काढून घेण्यात यावी अन्यथा आठव्या दिवशी सर्व अतिक्रमनांवर कारवाई करण्यात येईल व नदीपात्र मोकळे करण्यात येईल अशा प्रकारे नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
सीना नदी हे शहराचे वैभव होते परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सीना नदीचे पात्र अतिक्रमण धारकांनी लहान करून टाकले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काल महापालिका, पाटबंधारे विभाग, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग यांची एकत्रित बैठक घेतली होती. त्यामध्ये अतिक्रमणे काढण्यास निधीची अडचण असल्याचे समोर आले होते. त्यावर तोडगा काढताना जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास लागणारी मशिनरी यंत्रणा पाटबंधारे विभागाने पुरवावी, इंधनाचा खर्च महापालिका करेल, पोलीस विभागाने बंदोबस्त द्यावा व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करताना मदतीला यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
ज्या भागात पावसाच्या काळात पुराचे पाणी घुसते त्या भागातील अतिक्रमणे प्राधान्याने पहिल्यांदा काढण्यात येतील, तसेच पूररेषेत असणारी अतिक्रमणे दुसऱ्या टप्प्यात काढण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सीना नदीत सुमारे ३०० अतिक्रमणे असून नदीपात्र १५ किमी च्या हद्दीत आहे. अतिक्रमनांमध्ये अनधिकृत बांधकामे, पत्र्याची शेड, मातीचे भराव, वीट भट्ट्या, शेती, घरांचे बांधकामे यांसह अनेक अतिक्रमणे असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली असून सर्वाना आजच नोटिसा बजावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.