ब्रम्हपुरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून विकास कामांची गती काही प्रमाणात संथ झाली होती. आता मात्र, राज्यशासन कोरोनाच्या संकटावर मात करून विकासाकडे अग्रेसर झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा येथे आदिवासी मोहल्ल्यातील सभागृहाच्या बांधकामाचे व जल शुद्धिकरण केंद्राचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, प्रा. राजेश कांबळे, खेमराज तिड़के, प्रभाकर सेलोकर, पं. स. सदस्य ज्ञानेश्वर कायरकर, मंगला लोनबळे, प्रमोद मोटघरे, उषा भोयर, राम राऊत आदी उपस्थित होते.

आज संविधान दिन आहे. संविधानामुळेच आपली लोकशाही सशक्त असून विकासाची फळे आपण चाखत आहोत, असे सांगून पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार म्हणाले, एकारा येथील अंतर्गत रस्त्यासाठी 35 लक्ष रुपये आणि येथे नाट्यगृहासाठी 7 लक्ष रुपये त्वरीत देऊ. पुढील आठवड्यात या दोन्ही कामांना मंजूरी देण्यात येईल. परिसरातील विकासाच्या सर्व समस्या तातडीने सोडवू. येत्या दोन वर्षात ब्रम्हपुरी क्षेत्र विकासात अग्रेसर दिसेल, असेही ते म्हणाले.

अपघातग्रस्त शेतकऱ्याची आस्थेने विचारणा : बोन्द्रा येथे भूमिपूजन झाल्यानंतर, दोन दिवसांपूर्वी बैलाच्या धडकेत अपघातग्रस्त झालेले भूमिहीन शेतकरी अंबादास कोठेवार (वय 65) यांच्या घरी भेट देवून पालकमंत्र्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच औषधोपचारासाठी आर्थिक मदत सुद्धा केली. तर भुज येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विकासकामांच्या भूमिपूजन वेळी भुजचे सरपंच शालू रामटेके, कोसंबीचे सरपंच संगीता जेंठे, वान्द्राचे सरपंच महादेव मड़ावी, उपसरपंच गुरुदेव वागरे, सायगावचे सरपंच प्रतिभा कोडापे, गोगावचे सरपंच जयश्री दोडके आदी उपस्थित होते.

भूमिपूजन झालेली विकासकामे : यावेळी पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांच्या हस्ते एकारा येथे सभागृहाचे (20 लक्ष रुपये) तसेच जल शुध्दीकरण केंद्र (16 लक्ष), बोंद्रा येथे समाज मंदीर बांधकाम (15 लक्ष), जि. प. शाळा संरक्षण भिंत (15 लक्ष), भुज येथे जलशुध्दीकरण केंद्र (16 लक्ष), सामाजिक सभागृह (30 लक्ष), जि.प.शाळेतील विज्ञान कक्ष (16 लक्ष) आणि शाळेच्या संरक्षण भिंत (14 लक्ष), बुद्ध विहाराचे लोकार्पण (8 लक्ष), वांद्रा येथे जलशुध्दीकरण केंद्र (16 लक्ष), सभागृह बांधकाम (30 लक्ष) आणि वांद्रा -आक्सापूर – पवनपार – सायगाव – कमळगाव – मेंडकीला जोडणारा रस्ता (1.50 कोटी), सायगाव येथे बौध्द समाज मंदीर (15 लक्ष), हनुमान मंदिराजवळ समाज मंदिर (12 लक्ष), कमळगाव येथे जलशुध्दीकरण केंद्र, समाज मंदीर तसेच जि.प.शाळेची संरक्षण भिंत, गोगाव येथे पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण (70 लक्ष), गांगलवाडी येथे सामाजिक सभागृह, गांगलवाडी प्रा.आ.केंद्र ते राज्य मार्गाला जोडणारा रस्ता, बौध्द मोहल्ल्यातील सभागृह, बरडकिन्ही येथे सामाजिक सभागृह, जलशुध्दीकरण केंद्र, गांगलवाडी – बरडकिन्ही रस्त्यावर लहान पुलाचे पुर्नबांधणी बांधकाम तसेच आरोग्य उपकेंद्र इमारत, आवळगाव येथे जलशुध्दीकरण केंद्र, येथे बौध्द समाज मंदीर, सामाजिक सभागृह आणि जलशुध्दीकरण केंद्र आणि बोडधा येथे जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –