राज्यातील प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय खासदारांना केले. दरम्यान, केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठित करून तिच्या समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये समितीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे सोमवारी झालेल्या बैठकीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे कुटुंब म्हणून खासदारांनी दिल्लीत काम करावे आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडताना विषयानुरूप टीम तयार करा. त्यात पक्षीय भेदाला थारा देऊ नका. ज्यावेळी महाराष्ट्रातील विषयांवर खासदार संसदेत विचार मांडणार असतील त्यावेळी सर्व खासदारांनी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. पुढील महिन्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांची बैठक घेऊन प्रश्न सुटले की नाहीत याचा आढावा घेऊ.’’

बैठकीत खासदारांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्याचा विचार करून त्यावर राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन ते काम मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.

तसेच केंद्र शासनाकडे महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांचा पाठपुरावा केला जात आहे. पीक विमा योजनेत सुधारणा करणे आवश्यक असून पूर व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी सुमारे 15 हजार कोटी रुपयांपैकी 990 कोटी रुपये मंजूर झाले आहे. उर्वरित निधी मिळण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत तिथल्या बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं पत्र केंद्र शासनाकडे पाठविलं आहे त्याचा एकत्रित पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, चंद्रकांतदादांचे विठ्ठलाला साकडे

सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान देण्याची केंद्राकडे मागणी ; पाशा पटेल

दुधाला हमीभाव जाहीर करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही

चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे- अजित पवार