नुकसान भरपाई व विकास कामांचा 50 कोटींचा निधी दोन टप्प्यात देणार – अब्दुल सत्तार

सिंधुदुर्ग – कोरोना साथ रोगामुळे राज्याच्या महसूलामध्ये घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यांना विविध आपत्तीमुळे नुकसान भरपाई व विकास कामांसाठी देण्यात येणारा निधी देण्यात अडचणी येत होत्या. पण आता हळूहळू महसूलात वाढ होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी  नुकसान भरपाई व विकास कामांचा प्रस्तावित असलेला 50 कोटीचा निधी दोन टप्प्यात देण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.

फळ  संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे  जिल्हास्तरीय अधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सावंतवाडी  प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार प्रविण लोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकरी राजेंद्र पराडकर, दिपाली पाटील, कुडाळ गट विकास अधिकारी उमा पाटील, फळ संशोधन केंद्राचे संचालक बी.एन. सावंत व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, कोरोना काळामध्ये राज्याच्या महसूलातून आरोग्य सेवेवर अधिक निधी खर्च करुन कोरोना रोखण्याचे काम करण्यात आले. आता आपण कोरोनाला आटोक्यात आणण्यात यशस्वी होत आहोत. त्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानातून प्रत्येकाच्या घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे आपल्याला रोगी व निरोगी व्यक्तींची संख्या निश्चित करता आली. असे सांगून राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, महसूल विभागानेही महाराजस्व अभियान चांगल्या पध्दतीने राबविले. त्यामुळे जनतेची कामे अधिक गतीने होण्यास मदत झाली.

झोळंबे गावातील कुटुंबांचे पुनर्वसन

झोळंबे ता. दोडामार्ग येथे झालेल्या भूस्खलनामुळे 17 कुटुंबे बाधित झाली आहेत. यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून तो तातडीने निकाली काढण्यासाठी शासनाच्या ज‍मिनीमध्ये संबंधित कुटुंबांना घरे बांधून देण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आदेश यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

रेडी बंदराच्या कामकाजाची चौकशीचे आदेश

बैठकीनंतर राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी रेडी बंदराला भेट दिली. यावेळी तेथे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यावर राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी करुन त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी दौऱ्यामध्ये माडखोल येथील बचत गटाच्या वस्तु व खाद्य पदार्थाच्या प्रदर्शनाला भेट दिली. सावंतवाडी येथील राजवाडा येथील हस्तकला प्रदर्शनास भेट देवून सावंतवाडीच्या राजेची भेट घेतली व नियोजित रुग्णालयाच्या कामाबाबत चर्चा केली. सावंतवाडी येथील आयुवेर्दीक महाविद्यालयासही भेट दिली. सावंतवाडी येथील नियोजित नविन  पंचायत समितीच्या जागेची पाहणीही त्यांनी केली. तसेच कुडाळ येथे तयार झालेल्या नविन पंचयात समितीच्या कामाची पाहणी करुन या पंचायत समितीला फर्निचर खरेदीसाठी निधी तातडीने देण्याचे आश्वासन दिले. तसेच वेंगुर्ला येथील फिशींग व्हिलेजची पाहणीही त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या –