शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी

मुंबई: राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. या तक्रारींचे राज्य सरकारकडून त्वरेने निराकरण न झाल्यास शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१८ ऑक्टोबर रोजी दिवाळीमध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली . त्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या दिवशी संपूर्ण राज्यभरात त्या त्या जिल्ह्याच्या मुख्यालयात कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या कर्जमाफीच्या प्रमाणपत्रावरील रक्कमच गायब असल्याचे दिसून आले .

ज्या शेतकऱ्यांना रकमेचा उल्लेख नसलेली प्रमाणपत्रे देण्यात आली होती त्यांनी कार्यक्रम चालू असतानाच ही गोष्ट संबंधितांच्या लक्षात आणून दिली . त्यावेळी कार्यक्रमात काही वेळ गोंधळही झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने रकमेचा उल्लेख असलेली प्रमाणपत्रे वितरीत करावयास लावली . प्रशासनाचा हा निष्काळजीपणा शेतकऱ्यांच्या संतापास कारणीभूत ठरला . असाच काहीसा प्रकार उस्मानाबाद येथे झाल्याचे दिसून येते आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत तांबे या शेतकऱ्याच्या नावावर एक लाख ४० हजार रु. चे कर्ज आहे . कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमावेळी त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात १० हजारांचेच कर्ज माफ झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे . याबद्दल तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून संताप व्यक्त केला आहे .