पुण्यातील ‘सिम्बॉयसिस’मध्येही #MeToo,शिक्षण क्षेत्रात खळबळ

टीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. #MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आता आणखी एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

बॉलिवूडपाठोपाठ आता शैक्षणिक संस्थामध्येदेखील #MeToo चळवळ जोर धरायला लागली आहे. पुण्यातील सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधूनही (एससीएमसी) लैंगिक शोषणाबाबतचे काही प्रकार समोर आले आहेत. सिम्बायोसिसमधील काही आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सोशल मीडियावर हे अनुभव शेअर केले आहेत.

पुण्यातील विमाननगर येथे असणाऱ्या ‘सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन’च्या विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेले अनुभव सोशल मीडियावर व्यक्त करत एक मोहिमच सुरू केलीय. काही विद्यार्थ्यांनी त्यांना इंटर्नशीपच्या ठिकाणी आलेले शारीरिक शोषणाचे अनुभव सांगितले परंतु, तक्रार करूनही कॉलेज प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही केला. काही विद्यार्थिनींनी तर चक्क सिम्बायोसिसमध्ये शिकविणाऱ्या प्राध्यापकांविरोधातही तक्रारी केल्या आहेत.

समाजमाध्यमांमध्ये होत असलेल्या प्रकाराची दखल घेत सिम्बायोसिस प्रशासनाने ८ ऑक्टोबरला एससीएमसीच्या फेसबुक पेजवर ‘ओपन लेटर’ लिहून माफी मागितली. तसेच महाविद्यालयातील सध्याच्या आणि माजी विद्यार्थिनींना पुढे येऊन अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रारी नोंदवण्याचे, सुधारणेसाठी सूचना करण्याचे आवाहन करत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार विद्यापीठात अंतर्गत तक्रार समिती आहे. या समितीद्वारे समाजमाध्यमांतील तक्रारींबाबत पुढील कारवाई करण्यात येईल.

– डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिम्बायोसिस