पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – शंभूराज देसाई

शंभूराज देसाई

वाशिम –  जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. पेरण्या पूर्ण झाल्यानंतर रासायनिक खतांची मागणी वाढेल. रासायनिक खतांची विक्री शासनाने ठरवून दरानेच होणे आवश्यक आहे. जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कृषि विभागाला दिले. खरीप हंगाम, कोरोना सद्यस्थिती यासह इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी आज, १६ जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित सभेत ते बोलत होते.

आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, कृषि विकास अधिकारी विकास बंडगर या सभेला उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात व वेळेवर बियाणे, खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या आहेत. आगामी काळात रासायनिक खतांची मागणी वाढणार असल्याने खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. बियाणे, खते मिळाले नाहीत, अशी कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होवू नये, यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांना नियमितपणे कृषि सेवा केंद्रांची तपासणी करावी. तसेच बियाणे, खतांच्या अनुषंगाने कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी.

पिक कर्ज वितरणात राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही बँकांकडून पिक कर्ज वितरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे कमी प्रमाणात पिक कर्ज वाटप केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील शासकीय ठेवी काढून जास्त प्रमाणात पिक कर्ज वितरण करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील सुमारे १२ महसूल मंडळांमध्ये एकाच दिवशी ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्या मंडळांमधील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सदार करावा. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी रस्ते, पूल वाहून जाण्याचे, पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करून वाहतूक पूर्ववत करावी. तसेच जिल्ह्यातील कमी उंचीच्या सर्व पुलांची पाहणी करून त्याठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे जमा झालेला गाळ, कचरा दूर करावा. जेणेकरून पाणी वाहून जाण्यास होणारा अडथळा दूर होईल व पुलावर पाणी येणार नाही, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –