वाढती मागणी लक्षात घेऊन ‘या’ शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करावा – गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील

मुंबई – अंबरनाथ शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यादृष्टीने अंबरनाथ शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर करून शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत अंबरनाथ शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.

चिखलोली धरणाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावे

चिखलोली धरणाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावे. या धरणाच्या वाढीव कामासाठी वन विभागाच्या परवानगीची गरज आहे. त्यामुळे जलसंपदा व वन विभागाने तातडीने संयुक्त बैठक घ्यावी. जीर्ण जलवाहिन्या असल्यास त्या बदलण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावा व निधीची मागणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी दिले.

चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यांमधून विनाप्रक्रिया केलेले दूषित सांडपाणी धरणात सोडण्यात येत असल्याने शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या रसायनांचे योग्य पद्धतीने निस्सारण करण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले.

चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सध्या 6 दशलक्ष लिटर पाणी उद्भवातून मार्च 2020 पासून जलसंपदा खात्याने बंद केलेले आहे. त्यामुळे अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त पाणी उचलण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बदलापूर-शिरगाव येथील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 5 दशलक्ष लिटर पाणी तसेच फॉरेस्ट नाका अंबरनाथ येथे 5 दशलक्ष लिटर आणि पाले येथे 2 दशलक्ष लिटर पाणी मिळण्याबाबतची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत यावेळी करण्यात आली. तथापि नवरेनगर येथून 16 दशलक्ष लिटर पाणी व फॉरेस्ट नाका येथून चार दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत आहे. पाले येथील नळ जोडणीसाठी 2 दशलक्ष लिटर पाणी मंजूर करण्याची मागणी औद्योगिक विकास महामंडळाने यावेळी मान्य केली. पाले येथील नळजोडणीचे काम 80 मीटर राहिले असल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कार्यकारी अभियंता, अंबरनाथ यांनी उद्या संयुक्त पाहणी करून सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

विहित मुदतीत काम न केल्यास ठेकेदारावर कारवाई

अंबरनाथ पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराकडून दोन महिन्यात  पूर्ण करावे. अन्यथा त्याला नोटीस द्यावी व त्याने विहित कालमर्यादेत काम न केल्यास उर्वरित कामे नवीन ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

नवरेनगर पंप व पंपगृहाच्या प्रस्तावास मान्यता

नवरेनगर – म्हाडा कॉलनी येथे पाणी चढत नसल्यामुळे पंप व पंपगृहाच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी तसेच येत्या पंधरा दिवसात त्याची निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

यावेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर, अंबरनाथ येथील स्थानिक नगरसेवक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, अंबरनाथ नगरपालिका, जलसंपदा, उद्योग व पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –