कोरोनामुळे शेतकऱ्यांची फुले शेतात कोमेजली; राज्यातील फुल उत्पादक शेतकरी हवालदिल

जालना – कोरोनाचा वाढता कहर आणि वर्षभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन सत्रामुळे अंबड तालुक्यातील फुलशेती करणारे शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहे. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशात हाहाकार माजविला असून त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षी कोरोना असल्याने फुले बाजारात जावून विकता आली नाही. परंतु, यंदाही तीच परिस्थिती असल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील दहिपुरी ,दुधपुरी, पानेगाव ,वाघलखेडा ,दैठणा, काटखेडा, इत्यादींसह परिसरातील शेतकरी मोठ्याप्रमाणात फुलशेती करीत असतात. या फुलांना बाहेर राज्यासह पुणे, मुंबई, हैदराबाद , औरंगाबाद आदी शहरात मोठी मागणी असते. त्यामुळे या भागातील छोटामोठा शेतकरी हंगामी फुलांची लागवड करीत असतात. परंतु, गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण विश्व ठप्प झाले आहेत. या महामारीत लग्नसोहळे, समारंभ बंद झाल्यामुळे फुलांची मागणीही घटली आहे.

मागच्या वर्षात शेवटी काही प्रमाणात समारंभांना सूट देण्यात आली होती. परंतु, अनेक रेल्वे आणि बस बंद असल्यामुळे या फुलांची निर्यात करणे अवघड झाले होते. खाजगी वाहनांना परवानगी असली तरी या छोट्या शेतकऱ्यांना वाहनातून फुले घेवून जाणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची फुले शेतात कोमेजली. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे शासनाने पुन्हा लॉकडाऊनऐवजी संचारबंदी लागू केली आहे. अर्थात कडक निर्बंध असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी घेवून जाणे मोठे अडचणीचे ठरत आहे.