जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊनच कोरोना प्रतिबंधात्मक धोरण

नितीन राऊत

नागपूर – राज्य शासन असो वा जिल्हा प्रशासन सर्वोच्च प्राथमिकता सामान्य माणसाच्या जीवाची काळजी घेणे आहे. कोरोना काळात याच सूत्राने लॉकडाऊन व निर्बंधासंदर्भात निर्णय घेण्यात आले. शहरातील व जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरळीत सुरु राहील ही काळजी घेऊनच यापुढेही धोरणांची आखणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

प्रभावती ओझा स्मृती सेवा संस्था, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशन या तीन संस्थांच्या पुढाकारात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राच्या आयोजनाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाइन सहभाग घेत शुभेच्छा दिल्या. नागपूरमध्ये हा एक उत्तम प्रयोग होत असून या विचारमंथनातून पुढे येणारे तथ्य राज्य शासनाला धोरण ठरवतानाही कामी येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या चर्चासत्राला विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशन, वेद, एमआयए, क्रेडाई, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, यासह व्यापार-उद्योग औद्योगिक वसाहती, बिल्डर असोसिएशन व वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग होता. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रशासन निर्णय घेत असताना संघटनांच्या अडचणींना लक्षात घ्यावे, अशी मागणी या विविध संघटनांनी या चर्चासत्रात केली. चार टप्प्यात झालेल्या या चर्चासत्रामध्ये सुरुवातीला जिल्हाधिकारी विमला आर. यांच्यासोबत विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशनचे श्रवण कुमार मालूयांनी, पोलीस आयुक्त अमीतेशकुमार यांच्यासोबत तेजिंदर सिंग रेणू यांनी तर नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अश्विन मेहाडिया यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सोबत व्यापार, उद्योग समूहातील विविध अडचणीबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चासत्राची मांडणी रामकिसन ओझा यांनी केली. या तीन सत्रातील चर्चेला एकत्रित उत्तर देताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सर्व घटकांना विश्वासात घेऊन स्थानिक स्तरावर देखील निर्णय घेतला जाईल, असे आश्वस्त केले.

स्थानिक हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये आयोजित या चर्चासत्रात तीन तास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात विचारमंथन झाले. गेल्या दीड वर्षांमध्ये या साथ रोगामुळे व्यापार-उद्योग, निर्मिती क्षेत्रातील उद्योग समूहांवर आर्थिक संकट आले असून जिल्ह्यातील उद्योग अतिशय वाईट स्थितीतून जात असल्याचे विविध मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्पष्ट केले. यावर उत्तर देताना पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या सर्व परिस्थितीची जाणीव राज्य शासनाला आहे. जिल्हा प्रशासनालाही याची जाणीव आहे. त्यामुळेच यापूर्वी झालेले सर्व निर्णय विविध घटकांशी समन्वय साधून घेतले गेले आहे, राज्य शासन देखील या साथ रोगाशी लढतांना केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करते. त्यामुळे देशभर स्थिती अशीच आहे. तथापि, नागपूर तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय उपकरणांनी सज्ज आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही. औषधांचा तुटवडा भासणार नाही. तसेच रुग्णांचे वहन करताना अडचणी येणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या –