शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग – सुभाष देशमुख

मुंबई – शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सहकार आणि पणन विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून आता याकामी कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग घेण्यात येणार आहे. अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून यात कॉर्पोरेट संस्था आणि खरेदी विक्री संघ, वि.का.स. सोसायट्या यांच्यामध्ये सामंजस्य करार (M.O.U.) करुन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त खरेदी विक्री संघ तथा वि.का.स. सोसायट्या आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्री श्री. देशमुख म्हणाले, राज्यात सध्या २० हजार ११५ इतक्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत. तसेच ३४७ इतके जिल्हा / तालुका खरेदी विक्री संघ आहेत. सध्या यातील बहुतांश सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांच्या कामकाजाचे स्वरुप हे फक्त कर्जवाटप व कर्जवसुली एवढ्यापुरतेच मर्यादित राहीले आहे. शासनाने अटल महापणन विकास अभियानातून या सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

याद्वारे राज्यातील किमान ५ हजार वि.का.स. संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे. या कामी कॉर्पोरेट कंपन्याही मोठे सहकार्य देत असून त्यांच्या सहभागाने सेवा सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांच्या सक्षमीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पलासा ॲग्रो, फ्युचर ग्रुप, रॉयल ॲग्रो, महिंद्रा, रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स फ्रेश आदी काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून खरेदी विक्री संघ व वि.का.स. संस्थांचे नवनवीन व्यवसाय सुरु होत आहेत. आतापर्यंत सुमारे ८०० संस्थांचे नवीन व्यवसाय सुरु झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

पॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींगवर भर ते म्हणाले, पलासा ॲग्रो कंपनीने यासंदर्भात नुकतेच मंत्रालयात सादरीकरण केले. त्यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत किंवा प्रचलित बाजारभाव यापैकी जो जास्त असेल त्याप्रमाणे दर देण्याचे मान्य केले आहे. विकास सोसायट्या आणि खरेदी विक्री संघांमार्फत शेतमालाची खरेदी करुन या कंपनीस पुरवठा करण्यात येईल. त्याबदल्यात त्यांनाही मोबदला दिला जाणार आहे. या शेतमालाचे पॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींग इत्यादी करुन शेतकऱ्यांना बोनसही देण्याची तयारी या कंपनीने दर्शविली आहे. या कॉर्पोरेट कंपन्यांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाची पॅकेजींग, ब्रँडींग, मार्केटींग करुन त्यांना चांगला भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

गोरेगाव (जि. गोंदीया) व इगतपुरी (जि. नाशिक) या तालुक्यातील भात पिकासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. इगतपुरी खरेदी विक्री संघांतर्गत ५२ विकास सोसायट्या आहेत. त्या ठिकाणी घोटी भातपिकासाठी एका कंपनीबरोबर करार करुन शेतकऱ्यांना चांगला भाव आणि खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या यांना उत्पन्न मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत पलासा ॲग्रो या कॉर्पोरेट कंपनीने १४ खरेदी विक्री संघ व वि.का.स. संस्थांशी विविध कृषी मालाबाबत सामंजस्य करार केले आहेत. असाच प्रयोग राज्यभर राबवून शेतमालाला चांगला भाव आणि खरेदी विक्री संघ , सेवा सोसायट्यांना हक्काचे उत्पन्न मिळवून देण्यात येईल. यासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्या पुढे आल्या असून आता खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या यांनीही पुढे यावे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी खरेदी विक्री संघ, सेवा सोसायट्या यांनी जिल्हा उपनिबंधक किंवा तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.