बाजार समितीत सांकेतिक भाषा वापरून कांदा उत्पादकांची लूट

सोलापूर: पत्ती, वंदा, डब्बल वंदा, तिरंगा, पंजा (काँग्रेस) अशा सांकेतिक भाषेचा वापर करून खुल्या लिलावात शेतकऱ्याच्या लुटीचा प्रकार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आहे. उघड- उघड शेतकऱ्यांच्या डोळ्यात व्यापाऱ्यांकडून माती घातली जात असताना तेथे उपस्थित असणारे बाजार समितीचे निरीक्षक मात्र आंधळ्याचे सोंग घेत आहेत. अशा अनिष्ट गोष्टीमुळे लौकिक असणाऱ्या बाजार समितीची प्रतिमा मलीन होणार आहे.

लासलगावनंतर राज्यात सर्वात जास्त कांदा विक्री सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत होत आहे. सलग तीन वर्षांच्या मंदीनंतर कांद्याला चांगले दिवस आले आहेत. पण या मुळे शेतकऱ्यांचे गत तीन वर्षांत झालेले नुकसान काही अंशी भरून निघण्याची शक्यता असताना आडत्याकडून मात्र लूट होत आहे. बाजार समितीतील काही अाडते खुल्या लिलावात ‘वंदा (१००), डबल वंदा (२००), तिरंगा (३००), पंजा किंवा काँग्रेस (५००) असे सांकेतिक शब्द वापरत तेवढ्या रकमेचा फरक ठेवत शेतकऱ्यांच्या कांद्याची विक्री करत आहेत. चालू बाजार भावापेक्षा या सौद्यातील कांदा व्यापाऱ्याला १०० ते २०० रुपये स्वस्त अथवा एक महिन्याच्या उधारीवर मिळतो. त्यामुळे अाडत्याच्या लुटीत खरेदीदार सामील होतो.

लिलावाच्या वेळी असलेली गर्दी आणि शेतकऱ्याचे अज्ञान यामुळे शेतकऱ्यांना या बाबी लक्षात येत नाहीत. मात्र लिलावाच्या ठिकाणी बाजार समितीचे निरीक्षक फिरत असतात. त्यांच्या निदर्शनास ही बाब का येत नाही? की तेही या लुटीत सामील आहेत. या बाबत चौकशी होणे गरजेचे आहे. या पूर्वीही दैनिक दिव्य मराठीतून याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पण आडत्यांची बाजार समितीत असलेली संघटित दहशत, यापूर्वीच्या संचालक मंडळाचा लुटीला असलेला पाठिंबा यामुळे प्रशासन हतबल आहे का? अशी शंका आहे. पण या साऱ्या लुटीतून शेतकरी आणि ग्राहक नागवला जात असून, सोलापूर बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.