कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश

कर्जमुक्ती योजना

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून याचा ट्युटोरियल व्हिडिओ ( प्रशिक्षण चित्रफित) शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. या मोबाईल लिंकमध्ये झालेल्या छेडछाडीची शासनाने गंभीर दखल घेतली असून याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.  शेतकऱ्यांना काही शंका असल्यास मंत्रालयस्तरावर संपर्क कक्षाद्वारे त्यांना योजनेची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे.

ही  योजना  दि. २७ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. ही शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना पुढील खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

या योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी एक ट्युटोरियल व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कृषी विभागानेसुद्धा हा ट्युटोरियल व्हिडिओ (प्रशिक्षण व्हिडिओ)  एस.एम.एस. प्रणालीद्वारे त्यांच्याकडे उपलब्ध एम किसान पोर्टलवर उपलब्ध शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करून दिलेला आहे.

परंतु, शासनाच्या असे निर्दशनास आले आहे की, कृषी आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकमध्ये छेडछाड झाली आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली आहे आणि यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश  दिलेले आहेत. सोबतच सर्व शेतकऱ्यांना या ट्युटोरियल व्हिडिओची योग्य लिंक कृषी आयुक्तालयामार्फत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

शेतकऱ्यांना यासंदर्भात काही शंका असल्यास त्यांचे शंका समाधान करण्यासाठी मंत्रालय स्तरावर संपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षातील दूरध्वनी क्रमांक ८६५७५९३८०८, ८६५७५९३८०९, ८६५७५९३८१० असे असून त्यावर कार्यालयीन कामकाजाच्यावेळेत संपर्क करता येइल.

योजनेच्या सविस्तर माहितीसाठी http:/mjpsky.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील शासकीय इमारतींच्या परिसरात १०० ई- चार्जिंग स्टेशन उभारणार – डॉ. परिणय फुके

साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे- डॉ. लता त्रिंबके

मुळशीचा नाद खुळा : भात लावणीचा ‘हा’ नवा मुळशी पॅटर्न

वन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी