थंडीमुळे दरात घट, डाळिंबाची आवक पोहोचली 20 हजार क्रेटवर

सोलापूर : थंडीमुळे येथील बाजार समितीमध्ये डाळिंबाच्या दरात घट झाली आहे. मात्र, आवक वाढली आहे. तीन आठवड्यांपूर्वी होणारी साडेसात हजार क्रेटची आवक सध्या १५ ते २० हजार क्रेटवर पोहोचली आहे. डाळिंब खरेदीसाठी परप्रांतीय व्यापारी शहरात ठाण मांडून आहेत. सध्या प्रतिकिलो ४५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर प्रतिकिलो सरासरी २५ रुपये दर मिळत आहे.

व्यापारी चांगला दर्जाचा डाळिंब थेट बागेतून प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये दराने खरेदी करत आहेत.येथील बाजार समितीमध्ये डाळिंबाला मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यासह शेजारच्या माण, दहिवडी भागातून आणि अहमदनगर जिल्ह्यातूनही दररोजी भगवा जातीच्या २० हजारांहून अधिक क्रेट डाळिंबाची आवक होत आहे. परप्रांतीय व्यापारी चांगल्या प्रतीचा डाळिंब थेट त्या भागात जाऊन खरेदी करत आहेत. बाजार समितीमध्ये प्रतिकिलो सात रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सरासरी प्रतिकिलो २५ रुपये हा दर मिळत आहे. सध्या बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाची प्रतवारी दुसऱ्या क्रमांकाची असल्याचे सांगण्यात येते.

थंडीमुळे त्यावर डाग पडलेले आहेत. उरलेला मालही आणला जात आहे. थेट बागेतून चांगल्या प्रतीचा माल नेला जात आहे.दिल्ली, कानपूर, मथुरा, वाराणशी, अहमदाबाद, इंदूर, हैदराबाद या शहरांसह तमिळनाडू, बिहार, केरळ, ओरिसा राज्यातील व्यापारी डाळिंब खरेदीसाठी येथे आले आहेत. ते येथे राहून डाळिंब दुसऱ्या बाजारांमध्ये पाठवत आहेत. परंतु ४५ रुपयांपर्यंतच्या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याचे हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी संतोष घाडगे यांनी सांगितले. त्यांच्या ३५१ किलो मालाला दर्जेनुसार प्रतिकिलो १३, १७ आणि २० रुपये दर मिळाल्याचे त्यांनी म्हटले. मागे प्रतिकिलो ८० ते १२० रुपये दर होता. त्यात घसरण झाली होती.

सध्याचा दरही कमी असला तरी त्यात थोडी सुधारणा झाली आहे. त्यामुळे इतर तालुका जिल्ह्यांतील शेतकरी येथील बाजारात डाळिंब आणत आहेत.डाळिंबाच्या हंगामामुळे कोरोगेटेड बॉक्स आदी पॅकिंग साहित्याला मागणी वाढली आहे. पॅकिंग करणाऱ्या मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. लिलावावेळी बाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे.चांगला माल आलासुरुवातीला डाळिंबाची प्रतवारी चांगली नव्हती. त्यामुळे दर नव्हता. आता बाजारात त्या तुलनेत चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरातही वाढ होत आहे, असे सांगोला येथील व्यापारी अनिकेत कुलकर्णी यांनी सांगितले.