दूध पुरवठा रोखणाऱ्यांवर आणि नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामधे प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.तर दुसऱ्या बाजूला मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणाऱ्या आणि आंदोलनादरम्यान दूध फेकून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असं आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी केलं आहे. याशिवाय दूध रस्त्यावर फेकून देणाऱ्या, दुधाच्या टँकर्सना आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

दूर दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडीत काढण्याच प्रयत्न केला, तर सहन करणार नाही, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान,दुधासाठी शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं ठरवण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं केली असल्याची माहिती अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली.

मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पहिल्या दिवशी दूध पुरवठ्यावर परिणाम झाला नसला तरी दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

देवा मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, खा राजू शेट्टींचा पंढरपुरमध्ये विठ्ठलाला तर पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक