इंटरनेट जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त

Destroying the land of farmers for internet connectivity

गोंडपिपरी : तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीचे काम महाआयटीमार्फत सुरू आहे. केबल टाकण्यासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांच्या शेताच्या मध्यभागातून खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे धाबा – गोंडपिपरी मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होत असल्याने कंत्राटदारावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना उच्च क्षमतेच्या इंटरनेट जोडणीचे काम सुरू आहे. त्यासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांना पूर्वसुचना न देता केबल टाकण्यासाठी शेताच्या मध्य भागातून खोदकाम करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे धानगाठे भुईसपाट होत असून जमिनी उद्ध्वस्त होत आहे व शेताच्या मध्यभागातच मातीचे ढिगारे तयार होत आहेत.
या बेजबाबदार कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून त्यांना आपल्या हंगामासाठी जमीन सपाट करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. आज विहीरगावातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येत खोदकाम बंद केले आहे.

पुणतांब्यातील कृषी कन्यांचे आंदोलन मोडून काढले; गावकऱ्यांकडून निषेध

रस्त्याच्या मध्य भागापासून १२ मीटरच्या आत खोदकाम करणे अपेक्षित होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने शेताच्या मध्य भागातूनच खोदकाम केल्याने आमच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-नानाजी धुडसे, शेतकरी विहीरगाव

शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस व पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांच्या शेतात खोदकाम करणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई होणे गरजेचे आहे.
-संतोष बंडावार अध्यक्ष,
तालुका यु.कॉं. कमेटी गोंडपिपरी

रस्त्याच्या मध्यभागापासून खोदकाम हे नियमानुसार नऊ ते बारा मीटरपर्यंत करता येते. मात्र यापेक्षाही जास्त दूरवरून खोदकाम करणे हे चुकीचे आहे.
-रमेश शंभरकर, उपविभागीय अभियंता
सा.बां. विभाग, गोंडपिपरी