या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल

रात्रीचे 2 वाजत आले होते पाणी प्यायला उठलो मोबाईल चेक केला. असायमेंटचे ४ कॉल दिसले परत ऑफिसला कॉल केला तर तो उचला गेला नाही केला असेल कोणत्या बातमीसाठी अस वाटलं आणि परत झोपून घेतलं , पहाटे ३ च्या सुमारास आकाश येवलेचा यांचा कॉल आला तो ही उचला नाही .रात्री ऑफिसचा कॉल नंतर आकाशचा कॉल पाहून वाटलं की काही तरी गडबड आहे. हातात मोबाईल घेतला नेट ऑन केलं आणि ऑफिसचा ग्रुप चेक केला .तर समजलं की शहापुरला निघायचं आहे तेव्हा सकाळचे ६ वाजले होते. शहापुरला किसान सभेचा मोर्चा मुक्कामी होता सकाळी १० पर्यंत शहापुरला पोहोचायचं होत मोर्चा १ दिवस कव्हर करायचा अस वाटलं म्हणूण कपडे ही घेऊन गेलो नाही.

शहापुरला कुठून यायचं हे माहीत नसल्याने तिथले प्रतिनिधी सुनील घरात यांना कॉल केला विचारत विचारत १२ पर्यन्त शहापूर गाठलं मात्र मोर्चा १५ किलोमीटर पर्यंत गेला होता सकाळ पासून काम करणारे चंदन पुजाधिकारी, सुनील घरात , अभिजित सोनवणे मोर्चाच वार्तांकन करत होते त्यांना मोर्चा मधील १०० लोक ऑफिसला पाठवायचे असल्याने ते गाडी व लोक शोधण्यासाठी गेले आणि मग मोर्चाच वार्तांकन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि सुरू झाला किसान सभेच्या मोर्चातला संघर्ष.

दुपारचे 1 वाजले होते निसर्ग हॉटेलच्या मैदानात किसान सभेचा मोर्चा जेवणासाठी थांबला होता मोर्चाचे शेतकरी आपल्या आपल्या गावातून आलेल्या शेतकऱ्यांना जेवण करण्यासाठी आवाज देत होते. डोक्यावर ऊन तापलं होत जमीनही गरम झाली होती मैदानात एकही झाड नसल्याने हे आदिवसी शेतकरी उन्हात जेवण करत होते प्रत्येक गावतील मोर्चाला आलेल्या लोकांनी त्यांचा शिदा घरून आणला होता तर काही जण जागेवर जेवण बनवत होते. काहींच्या चुली पेटल्या होत्या भर दुपारी उन्हात खाण्यासाठीचा संघर्ष या आदिवासी शेतकऱ्यांचा होता आणि माझा संघर्ष उन्हात बसून जेवण करणाऱ्या शेतकऱ्याच्या बातमी करण्याचा, जेवण करत असताना त्यांची शिस्त वेगळी वाटत होती. ते एकमेकांना प्रेमानी विचारत होते वाढत होते आणि मी हे सगळं बघत होतो.

माझ्या सोबत असलेल्या कॅमरामन सुशांत राऊत याला कॅमेऱ्यात सगळं शूट करायला लावलं आणि बातमी करायला सुरुवात केली. ३ ते ४ मिनटं बातमी करण्यात घालवले जेव्हा ते लोक आपल्या प्रश्नासाठी डोक्यावर ऊन घेउन आलेत त्यांच्यासाठी काही करता येईल याचा विचार डोक्यात आलं आणि ठरवलं ही मोच्यात आपण ही यांच्या सारख जगायचं सोबत असलेले सुशांत आणि ड्रायव्हर राजू यांनी ही तेच ठरवलं आपण दुपारचं जेवण यांच्या बरोबर करायचं बातमी पूर्ण होत असताना किसान सभेचे अजित नवले आणि अशोक ढवळे त्या ठिकाणी आले आणि विचारपूस करायला लागले जेवण केलं का तेव्हा आम्ही नाही म्हणालो अजित नवले यांनी २ ताट आणली आणि वाढायला सुरवात केली. तेही आमच्या बरोबर जेवण करण्यासाठी बसले डोक्यावर ऊन, जमीन गरम होती मग काय मी ही ठरवलं आपण ही असच राहून पाहू मग जेवण झालं. लोक ही जेवण करून पुढच्या प्रवासाला लागली डांबरी सडक गरम झाली होती ही लोक या रस्त्यावर कशी चालतात ते डोळ्याने बघत होतो अनेक लोकांच्या पायात चप्पल देखील नव्हती तरी चालत होते. मोर्चात आलेले सर्व शेतकरी 50 वयाच्या पुढचे होते आयुष्यभर ज्या जमिनीत कष्ट केले ती जमीन नावावर झाली पाहिजे यासाठी ऊन वारा सहन करत १५० किलोमीटर चालत आले होते. त्यांच्या अंगावर देखील एकच शर्ट दिसत होता, हे सर्व मी त्यांच्या बरोबर चालत अनुभत होतो संध्याकाळी कुठं मुक्काम अस विचारले तर वळकस या ठिकाणी आहे त्यातील एकाने सांगितलं.

संध्याकाळचे ६ वाजले होते भातसा नदी वर यांचा मुककम होता सर्वजण नदी मध्ये उतरले काहींनी कपडे धुतले,अंघोळी केल्या चालून थकलेले शेतकरी आता निवांत बसून झोपण्याच्या तयारीत होते गावकरी याना मदत करत होते पण हे कोणी मदत घेत नव्हतं. कारण मोर्चा मधील सर्व सामान प्रमुख सांगत नाही तो पर्यंत कोणी काही घेत नव्हतं. निवांत बसून गाणी गप्पा मारणारे शेतकरी दिसत होते कसलीच चिडचिड नाही पायाला फोड आले तरी ते कोणाला सांगतात येत नाही अशी अवस्था यांची असताना ही लोक आदिवसी नृत्य सादर करत मनोरंजन करत होते रात्र झाली होती प्रत्येकांनी आपला स्वयंपाक केला होता कोणी जेवण करण्याच्या तयारीत होत तर कोणी झोपण्याच्या.

मात्र, माझ्या मनात सारखा विचार येत होता ही लोक किती साधी भोळे आहेत बाहेरच्या जगात काय सुरू आहे हे यांना माहीत आहे का ? यांनी कधी मुंबई बघितली असलं का ? असे एक ना अनेक प्रश्न पडत होते सर्व काम माझं ही संपत आलं होतं काय करायचं असा प्रश्न डोक्यात सुरू होता. ओबी इंजिनिर महेश तिखे , ड्रायव्हर विनोद पाटील, राजू गुरव , कॅमरेमान सुशांत यांना विचारल ते ही बोलले आपण आज यांच्या बरोबरच राहू मग तर ठरलं जेवण तिथं करायचं अस फायनल झालं मग काय सर्व काम संपून आम्ही नदीवर फ्रेश झालो तेव्हा 8 वाजले होते तेवढ्यात माहिती समजली की राज्यमंत्री एकनाथ शिंदें, व दादा भुसे शेतकऱ्यांना भेटणार आहेत मंत्री काही वेळात येणार असल्याने सर्व जण गप्पा मध्ये रंगले होते मंत्री महोदयांनी यायला नेहमी प्रमाणे उशीर केला. मंत्री येणार आहेत असं समजल्यावर शेतकरी आनंदी झाले पण प्रश्न सुटतील का ? अस त्यांना वाटत असावं अनेकांची हालत खूप खराब झाली होती, पाय सुजले होते कोणी डोकं दुखत आहे असं सांगत होत मात्र मंत्री येणार अस समजल्यावर सर्वांच दुखणं पळून गेल होत मंत्री आले त्यानी विचारपूस केली आणि आश्वासन देऊन निघून गेले.

मात्र, हे दमलेले शेतकरी आपल्याला भेटायला मंत्री आलेत आपले प्रश्न सुटेल या आशेवर बसले होते मंत्री गेले आणि मग जेवण सुरू केली मला त्यांच्यातील एकाने विचारले जेवण करून घ्या मुक्काम कुठं करणार मी ही त्याला तसच उत्तर दिलं तुमच्या बरोबर इथं जमिनीवर आणि जेवण ही करणार मग त्याला विश्वास बसेना अखेर त्याला बोलो भूक लागली करूया जेवण आम्ही बरोबर गेलो जेवण केलं त्यांनी परत विचारलं आता झोपणार कुठं कपडे आहेत का ते ही आमच्याकडे नव्हते मग काय एक पोत आणलं आणि मला दिल राजू आणि सुशांत गाडीत बसले होते ते ही झोपण्याच्या तयारीत आले एक पोत आणि 3 जण कसे झोपणार हे पाहून अजून एक शेतकऱ्यांना त्याचे कपडे दिले झोपण्याच्या आधी त्यांच्या बरोबर गप्पा सुरु झाल्या कसं जीवन जगता काय खाता कधी मुंबई बघितली का असे प्रश्न मी एकामागून एक विचारत होतो मात्र त्यांना हे सगळं नवीन नव्हत उत्तर ही हा नाही असं येत होतं आणि वनजमिनी मालकी हक्काच्या झाल्या पाहिजेत अस त्यांच्या बोलण्यातून येत होतं पहिला मुक्काम गप्पा मारण्यात समजून घेण्यात गेला

दिवस दुसरा उद्या
( क्रमशः )

( लेखक : सागर आव्हाड , पत्रकार TV9 मराठी )