कर्जमाफी देतांना शेतक-यांमध्ये भेदभाव – अनिल घनवट

अहमदनगर : कर्जमाफीची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांत छोटे आणि मोठे शेतकरी अशी फूट पडली. त्यानंतर कर्जमुक्ती देण्याऐवजी तत्वत: कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेण्याचे नाटक सुरू केलेले आहे. सरकारकडे सर्व माहिती आधीच उपलब्ध आहे.तरीही अर्ज भरून घेऊन नोटबंदीनंतर पुन्हा एकदा शेतकरी रांगेत उभा करण्याचे पातक सरकारने केले आहे.त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांना अर्जमाफी द्यावी,असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने एक दिवस लाक्षणिक उपोषण करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला.यानिमित्त लाल टाकी रोडवरील हुतात्मा चौथे शिवाजी महाराज स्मारकामध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष घनवट बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष (दक्षिण नगर) सचिन चोभे,जिल्हध्यक्ष (उत्तर नगर) बापुराव आढाव,स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष इंदूताई ओहोळ, जिल्हा उपाध्यक्ष संजय तोरडमल, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष महादेव खामकर, तालुकाध्यक्ष संदीप गेरंगे, त्रिंबक भदगले, रमेश रेपाळे, महादेव गवळी, संतोष वाघ, लक्ष्मण अवसरे, अशोक जगताप, शरद जोशी, जालिंदर कराड, डॉ.संजय कुलकर्णी, नामदेवराव धनवटे, कारभारी कणसे, आंबादास राऊत, सुधाकर देशमुख, नारायण पोटभरे, अनिल भुजबळ, रामदास वांगणे, आंबादास चव्हाण आदी उपस्थित होते.

घनवट म्हणाले की, शेतक-यांच्या कर्जमुक्तीबाबत एक प्रस्ताव शेतकरी संघटनेने १ ऑगस्ट २०१७ रोजी जिल्हाधिका-यांमार्फत शासनाला सादर केला होता. या प्रस्तावात शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त करणे,शेतीमाल आयात निर्यातीवरील सर्व नियंत्रण काढुन टाकणे, शेती विरोधी कायदे रद्द करणे, शेतीसाठी लागणारी वीज,पाणी,रस्ते याबाबत संरचना निर्माण करणे,ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग, गोदामे,शितगृह इथेनॉल निर्मिती इत्यादी शेती संलग्न व्यवसायांना चालना देणे व संपूर्ण कर्ज एकदम बेबाक करणे शक्य नसले तर १० वर्ष शेतीकर्ज वसुलीस स्थगिती देणे असे उपाय सुचविले होते.
शासानाने वरीलपैकी शेतकरी धार्जिणे निर्णय न घेता शेतक-यांच्या लुटीचेच धोरण चालू ठेवले आहे.शासनाच्या या शेतकरी विरोधी कृतीचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन केले.पुढील काळात याच मागण्यांसाठी संघटना जोरदार लढा उभारणार असल्याचे घनवट यांनी यावेळी जाहीर केले.