पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखाण्याचे संचालक मंडळ बरखास्त

पैठण / किरण काळे- संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तालुक्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सहकारी संस्थेच्या सहनिबंधक तथा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी बर्खास्त केले. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासक म्हणून विलास सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनी आमदार संदीपान भुमरे यांनी साखर आयुक्ताचा निर्णय सचिन घायळ कंपनीच्या बाजुने लागावा यासाठी त्यांची राजकीय शक्तिचा वापर केल्याचा आरोप तुषार शिसोदे यांनी यापूर्वी केला होता. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मदतीने साखर आयुक्तावर दबाव आणल्याचा आरोप शिसोदे यांनी केला होता.

मात्र, आमदार संदीपान भुमरे यांनी तुषार शिसोदे यांचे सर्व आरोप फेटाळले होते. मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष एवढे मोठे नेते त्यांच्याकडे आहेत. माझ्यासारखा आमदारकडे साखर आयुक्तावर दबाव आणून त्याना एखादा निर्णय घेण्यास भाग पडू शकतो एवढी मोठी राजकीय शक्ती आहे का? असा सवाल त्यांनी उपस्तित केला होता. शिसोदे यांनी असले गलिच्छ राजकारण करू नये असा सल्ला भुमरे यांनी शिसोदे यांना दिला होता.

काय आहे प्रकरण-

शासकीय रकमा भरण्यास संचालक मंडळ अकार्यक्षम असणे आणि बेकायदेशीररित्या अन्य कारखान्यास सहकारी कारखाना चालवण्यास देण्याचा ठराव घेणे, या गोष्टी चौकशीत सिद्ध झाल्या आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात आले आहे.

श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना लि. पैठण येथील कारखाना संचालक मंडळाने कारखान्याच्या व सभासदांच्या हितास बाधा आणणार्या गंभीर स्वरुपाच्या बाबी, अनियमितता व जाणीव पुर्वक शासनाच्या आदेशाचे उलंघन केले आहे. कारखान्याचे आर्थिक नुकसान केले आहे, असे आढळून आल्यामुळे संत एकनाथ कारखान्याच्या संचालकांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ अ (१)(ब) मधील तरतुदी नुसार मा.प्रादेशिक सहसंचालक (साखर) औरंगाबाद यांनी कारखाण्याचे संचालक मंडळ बरखास्त  करून कारखान्यावर सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्याकरिता प्रथम विशेष लेखा परिक्षक वर्ग १ सहकारी संस्था( साखर) औरंगाबाद विलास सोनटक्के यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच कारखान्याचे सर्व संचालकांना आदेशाच्या दिनांकापासून काढून टाकण्यात आले आदेशाच्या दिनांकापासून पुढच्या एका कालावधीची मुदत समाप्त होईपर्यंत कोणत्याही संस्थेच्या समितीच्या सदस्य म्हणून पुन्हा निवडून येण्यास, पुन्हा स्वीक्रुत केला जाण्यास किंवा पुन्हा नामनिर्देशित केला जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) औरंगाबाद यांच्या आदेशामुळे पैठण तालुक्यातील सहकार क्षेत्रात तसेच शेतकरी व सभासदामध्ये खळबळ उडाली आहे.

सहकारी संस्थेच्या सहनिबंधक तथा प्रादेशिक सहसंचालिका निलिमा गायकवाड यांनी कारखाण्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश काढला आहे. धोंडीराम एकनाथ एरंडे आणि विक्रम किशनराव घायाळ यांनी २१ जानेवारी रोजी अँड. दीपक चौहान यांच्या मार्फत तक्रार केली होती.

कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही – सचिन घायाळ (चेअरमन सचिन घायाळ शुगर प्रा.ली. )

आम्ही पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या सोबत असुन येणाऱ्या १५ ते २० दिवसात संत एकनाथ कारखाण्याचा ताबा घेणार आहोत. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही हि तर सुरूवात आहे संचालक मंडळ दोषी ठरले असुन त्यांच्यावर अनेक कारवाई होणार आहे. फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील आम्ही करणार आहोत.

या कारवाईशी आमचा संबध नाही – तुषार शिसोदे ( चेअरमन संत एकनाथ कारखाना,पैठण )

आमच्या संचालक मंडळाने कारखाना सुरळीत चालवला असुन शेतकरी हिताचे काम केले आहे.या कारवाईशी आमचा कुठलाही संबध नसुन आमच्या आगोदर जे संचालक मंडळ होते ते दोषी आहेत.आम्ही सर्व विद्यमान संचालक मंडळ लवकरच सहकार मंञ्यांना भेटुन या आदेशावर स्थगिती आणणार आहोत.

 

ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व नागरिकांमध्ये संभ्रम

यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या, नाशिक येथील शीला अतुल शुगर टेक ही कंपनी संत एकनाथ कारखाना बेकायदा चालवत आहे. या कंपनीने आतापर्यंत जवळपास ३३ हजार पेक्षा जास्त मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सचिन घायळ कंपनीने कारखान्याचा ताबा घेतल्यास उसाचे पैसे कोण देणार यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये संभ्रम व घबराट पसरली आहे.

आदेश डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

पैठणच्या ‘संत एकनाथ’चे संचालक मंडळ बरखास्त