धरणातील गाळ काढण्याबाबतच्या समितीची आढावा बैठक संपन्न

मुंबई : धरणातील गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या समितीची बैठक आज होऊन राज्यातील कामांचा आढावा घेण्यात आला.

जलसंपदा विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव इकबाल सिंह चहल होते. धरणातील तसेच तलाव, विहिरी व नाले यातील गाळ काढण्याच्या कामाबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अंतर्गत विविध जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा या समितीने घेतला.

गाळ काढण्याचे काम बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाले. तेथे टाटा ट्रस्टने 125 जेसिबी मशीन दिल्या आहेत. तेथे 50 लाख क्युबिक मीटर गाळ काढणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गाळ काढण्याच्या मोहिमेत विविध खाजगी संस्था व पाणी फाऊंडेशनचीही मदत होत असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. या बैठकीला मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, टाटा सन्सचे अमित चंद्रा, सदस्य निमेश शहा, दिप्ती कोमेरा, मानसी कपूर, अश्विनी पवार आदी उपस्थित होते.