‘फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा’, हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या – छत्रपती संभाजीराजे

खासदार छत्रपती संभाजीराजे

पंढरपूर – परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे. तर, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोलापूर जिल्ह्याचा आढावा दौरा करणार आहेत.

भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील पंढरपूरच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ३ दिवसात भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, ‘फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा’ असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांबद्दल तक्रारी केल्या असून केंद्राकडून पाठपुरावा करण्याच आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-