‘फुकट दूध प्या, आमचा तळतळाट घ्या’; आता शेतकरी वाटणार मंत्रालयाच्या दारावर दूध

पुणे: शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर द्यावा यासाठी 3 मे पासून शेतकरी फुकट दूध वाटून आंदोलन करत आहेत, शेतकरी आंदोलनांनंतरही सरकार लाज राखत नाही. त्यामुळे आता 9 मे नंतर थेट मंत्रालयाच्या दारावर फुकट दूध वाटत निर्लज्ज सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती महाराष्ट्र किसान सभेचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकारने दूध सघांना शेतकऱ्यांकडून 27 रुपये लिटरने दूध खरेदी करण्यास सांगितले आहे, मात्र प्रत्यक्षात 17 रुपयांनी दूध खरेदी केली जाते. त्यामुळे लिटर मागे 10 रुपयांची लूट केली होत आहे. या विरोधात 3 मे पासून शेतकऱ्यांनी आंदोलन करत फुकट दूध वाटले, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने लाज राखत निर्णय करणे गरजेच असताना तस होत नसल्याचा आरोप अजित नवले यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनानंतर सरकार दूध उत्पादकांना न्याय देईल हे वाटलं पण तसं होत नाहीये, आंदोलनाच्या चौथ्या दिवसापासून तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘दूध फुकट प्या आमचा तळतळाट मोफत घ्या’ म्हणत भाजप आमदार, खासदार सरकारी अधिकारी यांना बोलावून दूध देणार आहोत, 9 तारखेपर्यंत सरकारने दखल घेतली नाही तर हजारो शेतकरी मंत्रालयाच्या गेटवर जाऊन फुकट दूध वाटणार असल्याची घोषणा नवले यांनी केली आहे.