ऐन हिवाळ्यात विदर्भात दुष्काळ

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा सुरु होण्यास दोन महिने बाकी असतांनाच विदर्भात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्यात ३५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मागील वर्षी झालेली लातूर सारखी परिस्थिती विदर्भात पाहायला मिळणार कि काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे धरणे पुरेशी भरली नाहीत. त्यामुळे विदर्भवासियांना येणाऱ्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. विदर्भात पाणीच नसल्यामुळे शेतकर्यांनी कांद्याची लागवड केली नाही त्यामुळे कांद्याचे उत्पनात देखील घट होणार आहे.

नागपूरला पेंच धरणातून पाणीपुरवठा होतो मात्र मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे यंदा पेंच धरणात पुरेसे पाणी भरले नसल्याने नागपुरात होणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर कपात सुरु झाली आहे. तसेच ग्रामीण भागात विहरी, हापशी ला पाणी नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने टँकर पुरवण्यात येत आहेत. ऐन हिवाळ्यात  पाणीसंकट निर्माण झाल्यामुळे विदर्भातील शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच नागपुरात ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगत, नागपूर महापालीकेकडून नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या पाण्याचे ऑडीट करण्यात येणार असल्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या तुलनेत विदर्भातील धरणामध्ये सर्वात कमी पाणी साठा शिल्लक असल्यामुळे विदर्भातील बऱ्याच भागात पाणीटंचाईचे सावट दिसायला लागले आहेत. आणीबाणीप्रमाणे काटकसर करुण पाणी वापरण्याचा सावधगिरीचा सल्ला सिंचन विभाग देत आहे.