घ्या आता ! नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी वाचा ‘हनुमान चालीसा’ ; भाजप नेत्याचा अजब सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्यातील शेतकरी अवकाळी गारपीट झाल्याने चिंतातूर आहे. निसर्गाने तोंडचा घास पळवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे अशातच आता भाजपचे नेते रमेश सक्सेना यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम केल आहे. शेतकऱ्यांना मदत देणे सोडून अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे.

“सर्व गावातील शेतकऱ्यांनी रोज एक तास सामूहिकरित्या हनुमान चालिसा वाचावी, जेणेकरुन नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. हनुमान चालिसा वाचल्यास गारपीट किंवा कोणतेही नैसर्गिक संकट येणार नाही, असा माझा दावा आहे.” अस भाजप नेते रमेश सक्सेना यांनी म्हटलं आहे. रमेश सक्सेना हे मध्यप्रदेश मधील भाजपचे नेते आहेत. यात विशेष बाब म्हणजे मध्य प्रदेशचे कृषिराज्य मंत्री बालकृष्ण पाटीदार यांनीही समर्थन केले आहे. कृषिराज्य मंत्री म्हणाले, “नैसर्गिक आपत्तींना माणूस जबाबदार नाही. हनुमान चालिसा वाचायलाच हवी. कारण हनुमान संकटमोचक आहेत. त्यामुळे सक्सेना यांनी काही चुकीचे म्हटले नाही.”