अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड

हिंगोली – मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपूर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री  प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पुर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात तसेच मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. तरीही निजाम शरण येत नसल्याचे पाहून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी  निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला, असे पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या जोखडातून मुक्त केले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. त्याची जाणीव ठेऊन मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषि विषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या.

पालकमंत्री वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन 8 हजार 919 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून 22 घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  तसेच अतिवृष्टी आणि पुर परिस्थितीत दुर्दैवाने प्राण गमवावे लागलेल्या 07 लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 04 लाख  रुपयाची सानुग्रह मदत देण्यात येत आहे. यापैकी 03 मयत लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 04 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली असून उर्वरीत 04 मयत लोकांच्या कुटुंबियांना मदत देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –