परतीच्या तुफानी पावसाने नगर जिल्ह्याला झोडपले, शेतातील पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर: मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने नगर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. कोपरगाव वगळता उर्वरित 13 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 100 टक्के पाऊस झाला असून एकूण जिल्ह्यात सरासरीच्या 147 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला असून शेतांमधील उभी पिके पावसाच्या माऱ्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस विशेषत: मागील तीन दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्व लहान मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.विशेषत भंडारदरा,निळवंडे, मुळा या तीन प्रमुख धरणांसहीत 8 प्रकल्प अक्षरश: ओसंडून वाहात आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहातांना दिसत आहेत.11 ऑक्टोबरपर्यंत नगर जिल्ह्यात सरासरीच्या 147 टक्के इतका विक्रमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

अकोले,संगमनेर,राहाता,राहुरी,शेवगाव,नेवासे,पारनेर,श्रीगोंदा,श्रीरामपूर,नगर,पाथर्डी,कर्जत,जामखेड या 13 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. कोपरगाव तालुक्यात मात्र 95 टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीपात्रांमध्ये सध्या प्रचंड पाणी आहे.धरमांमधून देखील पाणी सातत्याने नदी पात्रात सोडले जात आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसामुळे संपूर्ण नगर जिल्हा पाणीदार झाला असला तरी परतीच्या या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतांमध्ये साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर भिजला आहे. तसेच भाजीपाला,कापूस आदि पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टि होत असल्याने काही प्रमाणात त्याचा फटका दिवाळीच्या खरेदीला देखील बसला आहे.दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आलेली असतांनाही पावसामुळे अद्यापही बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत नसल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.