बासमती तांदळाच्या लागवडीत कमालीची घट

वेबटीम : बासमती तांदळाच्या उत्पादनात जागतिक पातळीवर वरचढ असलेल्या भारतात यावर्षी लागवड कमी झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण अर्थात एपीडाने आपल्या बासमती तांदळाच्या अलीकडेच केलेल्या एका अहवालात सांगितले आहे की, मागील वर्षीच्या (२०१६) खरीप हंगामाच्या तुलनेत यावेळी (२०१७) देशभरात बासमती तांदळाच्या लागवडीत ७.९२ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात १६८८.८ हजार हेक्टरवर बासमती तांदळाची लागवड करण्यात आली होती, जी यावर्षी १५५५.० हजार हेक्टरवर नोंदवली गेली आहे. एपीडाचे सल्लागार विनोदकुमार कौल यांनी सांगितले आहे की, बासमती तांदळाचे प्रमुख उत्पादक राज्य हरियाणात मागील वर्षीच्या तुलनेत ९.३० टक्क्यांनी, पंजाब मध्ये ८.८४ टक्क्यांनी, उत्तरप्रदेश मध्ये ३.७६ टक्क्यांनी, उत्तराखंड मध्ये २.४३ टक्क्यांनी, जम्मू-काश्मीर मध्ये २.०९ टक्क्यांनी, हिमाचल प्रदेश मध्ये १.२५ टक्क्यांनी तर दिल्ली प्रदेशात २.६७ टक्क्यांनी घट झाली आहे. बासमती तांदूळ उत्पादक क्षेत्रात मॉन्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहिल्यामुळे त्याचा परिणाम बासमती तांदळाच्या लागवडीवर झाला आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

एपीडा तयार केलेला आपला हा अहवाल (बासमती सर्वे रिपोर्ट-२०१७) देशातील ७ राज्यांतील ८१ पैकी ७८ जिल्ह्यांमधील शेतकरी आणि कृषी तज्ञांची प्रत्यक्ष भेट घेऊन तयार केला आहे.