शालेय उपक्रमाचा लाभ घेऊन जिल्हा परिषद शाळांमधील सोयीसुविधा वाढव्यात – बाळासाहेब पाटील

बाळासाहेब पाटील

सातारा – राज्य शासनाचे अनेक शाळा उपयोगी उपक्रम आहेत, या उपक्रमांचा लाभ घेऊन सातारा जिल्हा परिषदेने त्यांच्या अखत्यारीतील शाळांमधील सोयी-सुविधा वाढव्यात, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या स्व-निधीतून खरेदी करण्यात आलेल्या स्मार्ट टीव्ही व संगणकांचे वितरण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, अर्थ व  शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मनोज जाधव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, देवराज पाटील, लालासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

प्रारंभी राज्यातील विविध प्रशासनामध्ये, समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये तसेच उद्योगांमध्ये यशस्वी झालेले अनेकजण हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी आहेत असे उदाहरण देवून पालकमंत्री पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या 319 स्मार्ट टीव्ही व 554 संगणकांचे वाटप आज वाटप करण्यात येत आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार सातारचे पालकमंत्री असताना त्यांच्या काळात अनेक चांगली कामे झाली. आज त्यांच्याकडे राज्याचे अर्थ व नियोजन खाते आहे.  त्यांचे आपल्या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे.

कोरोना संकटाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. तरी मुलांचे शिक्षण थांबले नाही. जिल्हा परिषदेच्या 2 हजार 692 शाळांमध्ये 1 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाबरोबर जिल्हा प्रशासनही प्रयत्न करीत आहे. या संकटावर मात करत असताना घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, असेही आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांचा पाया मजबुत करावा. पाया जर मजबुत झाला तर ते भविष्यात कुठेही कमी पडणार नाहीत. प्रत्येक पावसाळ्यात डोंगरी भागातील शाळांची पडझड होते, या शाळांच्या दुरुस्ती साठी तसेच इतर शाळांमधील सेायी-सुविधा वाढविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले. या कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –