४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी अनुदानाचे वाटप

जळगाव-:  एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संरक्षित शेतीसाठी जिल्ह्यातील ४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी २७ लाख १५ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सामुहिक शेततळयांसाठी २८७ शेतकऱ्यांना ६ कोटी 63 लाख ६१ हजार रुपये, शेडनेटसाठी ५७ शेतकऱ्यांना २ कोटी ५८ लाख ३७ हजार रुपये तर हरितगृह (पॉलीहाऊस) साठी ९० शेतकऱ्यांना ८ कोटी ५ लाख १७ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली होती. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नविन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे, सामुहिक शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेडनेटहाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अन्नद्रव्ये व एकात्मिक किड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीतोर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

सन २०१४-१५ पासुन केंद्र शासनाने हा कार्यक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानतंर्गत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत संरक्षित शेती या घटकामध्ये हरितगृह उभारणी, शेडनेट हाऊस यासाठी अनुदानाची क्षेत्र मर्यादा १ हजार चौरस मीटर वरून ४ हजार चौरस मीटरपर्यंत वाढविली आहे.अभियानाची उद्दिष्टेवैविध्यपूर्ण कृषि हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, पणन सुविधा यांच्या माध्यमातून सामुहिक पद्धतीने सर्वांगीण विकास करणे. शेतक-याना एकत्रित करून शेतक-यांचे गट निर्माण करणे व शेतकरी उत्पादक समूह स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे. शेतक-यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व आहाराविषयी पोषणमुल्य वाढविणे. आस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे. पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे. कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरूणांकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. हा या अभियानाचा उद्देश आहे.

अभियानाची वैशिष्ट्येउत्पादक ते अंतिम उपभोक्तापर्यंत फलोत्पादनाच्या विनियोगासाठी उत्पादक, काढणीत्तोर हाताळणी, प्रक्रिया व पणन व्यवस्था तसेच उपभोक्ता यामध्ये साखळी निर्माण करून उत्पादकांना अधिकाधिक मोबदला मिळेल याची खात्री करणे. उत्पादन, काढणीत्तोर हाताळणी, प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे. पेंक हाऊस, रायपनिंग चेंबर, शीतगृह, नियंत्रित वातावरणातील साठवणूकगृह यासारख्या काढणीत्तोर सुविधा तसेच मुल्यवृधीसाठी प्रक्रिया सुविधा आणि पणन अशा प्रकारच्या सुविधा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य करणे. संशोधन आणि विकास प्रक्रिया आणि पणन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थामध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक, राज्य तसेच स्थानिक स्तरावर समन्वय व एकात्मिकता आणि एकरूपता आणून भागीदारीस प्रोत्साहन देऊन विकास साधणे.

सर्व स्तरावर क्षमता, विकास व मनुष्यबळ विकासासाठी राबविण्यात येणा-या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे ही या अभियानाची वैशिष्टे आहे. शेतक-यांच्या सोयींसाठी hurtnet.gov.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर शेतकरी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या योजनेसाठी अर्ज करू शकतात, यामुळे वेळेची व पैशाची बचत होते. हॉर्टनेटद्वारे अनुदान वितरण थेट लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये जमा केले जाते.