सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उत्पादकता वाढवावी-गडकरी

नागपूर-  शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च व रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास उत्पादकता अडीच पटीने वाढवता येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात सुरु असलेल्या ऍग्रोव्हीजन कृषीप्रदर्शनांतर्गत आयोजित कृषी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, उत्तरप्रदेशातील भदोईचे खासदार विरेंद्र सिगं प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी गडकरी म्हणाले की, एनपीके खतांमध्ये सेंद्रीय फॉस्फरस व पोटॅशियम निर्मीती करणे शक्य आहे. पण, सेंद्रीय नायट्रोजन करिता असे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते. परंतु, आता सेंद्रीय नायट्रोजन निर्मीती मानवी मूत्रापासून करणे शक्य झालेय. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात युरीन बँक स्थापन करणे आवश्यक आहे. त्याच्या कॉन्स्ट्रेशन करून डिस्टिलेशनद्वारे त्यातील सेंद्रीय नायट्रोजन वेगळा करता येतो. अशा पद्धतीने ठिबक सिंचनाव्दारे द्रवरूपातील विरघळणारा सेंद्रीय नायट्रोजन पिकांना मळू शकतो. असे केल्यास युरिया खताचा वापर करण्याची गरज भासणार नाही. तसेच ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च वाचू शकतो असे गडकरी यांनी सांगितले.

शेतीला दुग्धोत्पादन, बांबूलागवड, मधमाशी पालन, मत्स्यशेती आणि इथेनॉल निर्मीती या पाच पुरक उद्योगांची सोबत असणे आवश्यक आहे. आता कॅनाल ऐवजी पाईपने सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारच्या निर्णयामुळे ५ हजार कोटी रुपयांचा भू-संपादनाचा खर्च वाचणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. वन ड्रॉप-मोअर क्रॉप या संकल्पनेवर आधारित ठिबक सिंचनाचा पाईपद्वारे वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन निश्चितपणे वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट आणि खा. विरेंद्र सिंग यांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍग्रव्हिजन सल्लागार सिमतीचे अध्यक्ष डॉ. मायी यांनी केले.