कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बीड  : आष्टी शहरातील ब्रम्हगाव फाटा येथे राहणा-या एका शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुभाष राजाराम काळे (वय ४५ ) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव असून त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बँकेचे आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर असतांना मुलींचे लग्न करायला पैसे नव्हते त्यामुळे ते चिंताग्रस्त होते.

यातच त्यांनी हा निर्णय घेत आपले जीवन संपवले. सुभाष काळे यांनी शेतातील घराच्या बाजूला असणाऱ्या मक्याच्या शेतात फवारणीचे औषध घेऊन त्याच अवस्थेत घरी आले. तेव्हा त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे घरच्यांनी बघितल्यानंतर त्यांना तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.