अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार – संजय बनसोडे

संजय बनसोडे

लातूर – जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाची ऊर्जा लाभली असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ टाऊन हॉल लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव यांच्यासह आदि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने पोलीस धुन ( बिगुल) वाजवून हवेत तीन फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात येवून त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देतांना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद, काश्मीर व जुनागढ  संस्थानांतील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली  मोठे आंदोलन छेडले गेले त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. त्यावेळी लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग होता. त्यात लातूर जिल्ह्याचे योगदानही मोठे होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम सतत 13 महिने सुरु होता व या लढयात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येण्यास तयार नव्हता त्यावेळी भारत सरकारने  पोलीस ॲक्शन सुरु केली. व शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढयामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर मराठवाड्याची लातूर जिल्हयासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु झाली.

संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला मान्यता दिलेली असून यात लातूर जिल्ह्याचा समावेश असून येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह  संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात 16 सर्कलमध्ये 65 टक्के पर्जन्यमान झाले असून यात ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे त्यांनी  72 तासाच्या आत ऑनलाईन, ऑफलाईन, पध्दतीने अर्ज करण्याची कार्यवाही ही पूर्ण झाली आहे.  या सर्व शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार आहे.

यापुढे बोलतांना राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, कोविड-19 ने जगभरात थैमान घातलेले आहे. कोविडची दुसरी लाट ओसरत असून संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविडच्या या लाटेत राज्य शासनामार्फत चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासन प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहे. या कालावधीत नागरिकांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

जिल्ह्यातील आरोग्य विभागामार्फत इतर विभाग, जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्याने कोविड-19 लसिकरणामध्ये उद्दिष्ट 20 लाख 56 हजार 84 आहे. त्यापैकी  प्रथम डोस 8 लाख 14 हजार 71 तर द्वितीय डोस 2 लाख 99 हजार 885 नागरिकांना असे एकूण 11 लाख 13 हजार 956 नागरिकांचे आरोग्य विभागामार्फत लसीकरण करुन उद्दिष्ट साध्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या –