कांदा आयातीच्या निर्णयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त

अहमदनगर : केंद्र सरकारने बाहेरील देशातून कांदा आयात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसू लागला आहे.15 दिवसांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने भाव वाढतील या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतक-यांना आता निम्म्यापेक्षा कमी किंमतीला कांदा विकावा लागत आहे.अवघ्या 15 दिवसांमध्ये कांद्याचे दर निम्याने खाली आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

बाहेरील देशातील कांदा बाजारात येण्याची शक्यता असल्याने व्यापारी देखील धास्तावले असून शेतक-यांकडील कांदा चढ्या दराने घेण्यास आता व्यापारी देखील तयार नसल्याने कांद्याचे दर कोसळून शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.अहमदनगर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतकरी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.

मध्यंतरीच्या काळात बाजारात कांद्याची मोठी आवक होऊनही बाजारात मात्र कांद्याला चांगला दर मिळू लागल्याने शेतकरी सुखावला होता. सुमारे 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3 हजार रूपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळाला होता. कांद्याचे दर वाढू लागल्याने मागील वर्षी प्रमाणे यंदाही 4 हजार रूपये इतका भाव मिळण्याची आशा शेतक-यांना वाटू लागली होती.त्यामुळे भाव वाढण्याची अपेक्षा ठेवून अनेक शेतक-यांनी आपला कांदा बाजारात न आणता भाववाढ होण्यासाठी थोडी वाट पाहाण्याचा निर्णय घेतला.

बैलपोळा झाल्यानंतर कांद्याचे दर वाढतात हा मागील काही वर्षातील शेतक-यांचा अनुभव आहे.मात्र काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने बाहेरील देशांमधून कांदा आयात करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अपेक्षेनुसार बाजारातील कांद्याचा भावावर मोठा परिणाम दिसून आला आहे. बाहेरील देशातील कांद्या प्रमाणेच शेजारच्या राज्यातील नवीन कांदा देखील बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने त्याचा परिणाम जुन्या गावरान कांद्याच्या दरावर झाला आहे. भाव कमी होत असले तरी आता शेतकर्यांनी साठवणुक केलेल्या कांद्याची क्षमता संपल्याने नाईलाजाने शेतक-यांना मिळेत त्या दराने कांदा विकणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यातील राहुरी,श्रीरामपूर, घोडेगाव,नगर,पारनेर,राहाता अशा सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची मोठी आवक होत असून भाव मात्र वेगाने कोसळतांना दिसत आहे