शेतकरी त्रस्त आहेत मात्र मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त – नवनीत राणा

नवनीत राणा

मुंबई – परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यानंतर अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला होता तर परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई व इतर कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं.

मात्र, सणावाराच्या तोंडावर आर्थिक संकट शेतकऱ्यावर कोसळलं असतानाच झालेल्या नुकसानीचे काही ठिकाणी पंचनामेच होत नसल्यानं रब्बी पिके तरी कसं घेणार? बियाणांचा खर्च कसा उचलणार असे अनेक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वात ३ नोव्हेंबर रोजी अमरावतीमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर, नवनीत राणा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ४ नोव्हेंबर रोजी भेट देखील घेतली. ‘विदर्भातील शेतकरी त्रस्त-मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त’ अशी टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. राज्यपालांच्या भेटीवेळी आमदार रवि राणा हे देखील उपस्थित होते. लाल्या रोग व बोंडअळीने खराब झालेली कापसाची झाडे राज्यपालांना दाखवून त्यांनी परिस्थितीची गंभीरता सांगितली.

…अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही- राणा

‘यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले. यानंतर आता कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे आता कपाशीचे पीकसुद्धा वाया जात आहे. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी.’ तसेच, ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका नवनीत राणा यांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या –