देशभरातील शेतकरी संघटना एकवटणार, राजू शेट्टी यांनी दिली माहिती

२६५ शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी मंडळाची महत्त्वाची बैठक येत्या १५ व १६ जानेवारी रोजी होणार आहे. ही बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

शेट्टी म्हणाले, की केंद्र सरकारने शेतीमालाच्या बाबतीत किमान आधारभूत किमतीच्या दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकरी कामगार विरोधी धोरण, शेतीमालाच्या आयात-निर्यातीबाबतचे धरसोडीचे धोरण, तसेच देशातील शेतकऱ्यांच्या बोकांडी लादलेला आरसीईपी करार या सर्व धोरणांच्या विरोधात देशभराच्या विविध राज्यांमधील २६५ शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ८ जानेवारी रोजी संपूर्ण ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आता राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या जनआंदोलनासाठी देशभरातील शेतकरी संघटना जय्यत तयारीत आहेत.