शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड फक्त दोन आठवड्यांत

पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड तात्काळ मिळण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी संपूर्ण भरलेला अर्ज बॅंकेला मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जाणार आहे. देशातील लाखो शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्याच्या जाळ्याच्या बाहेर आहेत. हे शेतकरी कर्जासाठी खासगी सावकरांवर अवलंबून असतात . या शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याची मोहीम हाती घेतल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉली चक्रवर्ती यांनी सांगितले. सध्या किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांची संख्या ६.९५ कोटी आहे. त्यांना सवलतीच्या दरात पिककर्जपुरवठा केला जातो. पिककर्जासाठी ९ टक्के व्याजदर आहे. परंतु तीन लाखापर्यंतच्या अल्पमुदतीच्या पिककर्जासाठी २ टक्के व्याज सवलत दिली जाते. तसेच वेळेवर कर्ज परतफेड केल्यास आणखी ३ टक्के सवलत मिळते. थोडक्यात शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदर पडतो. पशुसंवर्धन, डेअरी आणि फिशरी व्यवसायात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय सरकारने याआधीच घेतला आहे.

”संस्थात्मक कर्जपुरवठ्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आजही खूप आहे . त्याचे कारण म्हणजे एक तर या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, किंवा मग याआधी वितरित केलेले कार्ड काही कारणांमुळे बंद झाले आहे. त्यामुळे सरकारने एक विशेष मोहीम हाती घेऊन त्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे, ” असे डॉली चक्रवर्ती म्हणाल्या.