शेतकरी कर्जमाफीची यादी आठवडाभरात प्रसिध्द होणार

सांगली: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेअंतर्गत माहिती न जुळलेल्या यादीतील शेतक-यांच्या पात्र- अपात्रतेचा निर्णय घेऊन दुरूस्त अंतिम यादी येत्या पाच दिवसात तातडीने पाठविण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीबाबतचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सांगली जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक सुधीर काटे यांना हा आदेश दिला.

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अंतिम यादी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार शेतकरी कुटुंबांनी आपले अर्ज ऑनलाईन दाखल केले होते. त्यातील ९१ हजार १८९ शेतक-यांना १८७ कोटी ३५ लाख रूपयांची कर्जमाफी मिळाली. मात्र आजही ६५ हजाराहून अधिक शेतकरी या कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. काही शेतक-यांनी अर्जात भरलेली माहिती व संबंधित बँकेची माहिती यांचा मेळ लागत नसल्याने या योजनेअंतर्गत सादर तीन याद्या राज्य शासनाने पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठविल्या होत्या. त्या याद्या आता तातडीने दुरूस्त करून दि. १३ फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाकडे परत पाठवाव्यात. शेतकरी कर्जमाङ्गी योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एकही शेतकरी वंचित राहू नये, याची पूर्णपणे दक्षता संबंधित अधिका-यांनी घ्यावी, असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.