सिंघू बॉर्डरवर सुरु झाला शेतकरी मॉल, या मॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणार मोफत

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

गेल्या 34 दिवसांपासून सुरु असलेलं हे आंदोलन कसं पुढे जात आहे? आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था काय? दिल्लीसारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन कसे तग धरुन आहेत? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. शेतकऱ्यांनी स्वतः आणि या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्यांनी या आंदोलनाची नीट व्यवस्था केली आहे. चहा, जेवण, गरम कपड्यांपासून ते झोपण्यासाठीच्या अंथरुणापर्यंत शेतकऱ्यांनी चोख व्यवस्था केली आहे. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी आंदोलनाचे समर्थन करणारे लोक, स्वयंसेवी संस्था आणि काही पक्ष आपआपल्या परिने योगदान देत आहेत.

दरम्यान, खालसा एडने दिल्लीला लागून असलेल्या सिंघू बॉर्डरवर एक शेतकरी मॉल सुरु केला आहे. या मॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू मोफत दिल्या जात आहेत. यामध्ये बूट, चपला, तेल, साबण, गरम पाण्याचा गीझर, टूथपेस्ट, डिसपोजल बॅग्स यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. या मॉलप्रमाणे टिकरी बॉर्डरवर गेल्या आठवड्यात एक दुकान सुरु झालं आहे, जिथे शेतकऱ्यांना मोफत वस्तू दिल्या जात आहेत. रविवारी सिंघू बॉर्डरवर अजून एक दुकान सुरु झालं आहे, ज्या दुकानाद्वारे एकूण 28 प्रकारच्या वस्तू शेतकऱ्यांना मोफत पुरवल्या जात आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना भटकावं लागतं होतं.

तर, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.

महत्वाच्या बातम्या –