गिरीश महाजन यांचा नौटंकीपणा; मदतीचे सोंग करून शेतकरी मोर्चात दाखल

मुंबई: अखिल भारतीय किसान लाँग मार्च मुंबईत धडकला. जसा-जसा मोर्चा मुंबई जवळ येऊन  पोहचला. तसे राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार बेजाबदारपणे वागत असून मोर्चात सहभागी होणे म्हणजे गिरीश महाजन यांचा नौटंकीपणा होता, अशी टीका केली आहे.

नाशिकमधून निघालेले लाल वादळ म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी पहाटेच लाँग मार्च आझाद मैदानावर आला. एकीकडे शेतकरी इतक्या शहाणपणाने वागत असताना सरकार मात्र बेजबाबदारपणे वागतंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुंबईत येऊन धडकलेल्या किसान लाँग मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आल्यानंतर मुंबईकर आणि राजकीय पक्षांनी सकारात्मक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. सरकारनेही पूर्वीच ही भूमिका घेतली असती तर आज ही वेळ ओढवली नसती. तसेच मोर्चात सहभागी होणे म्हणजे गिरीश महाजन यांचा नौटंकीपणा होता. आपण सरकारमध्ये आहोत, मंत्रिमंडळात आहोत, निर्णय घेणं हे आपलं काम आहे, ही गोष्टी त्यांना कळली पाहिजे. मात्र, निर्णय घ्यायचा सोडून केवळ शेतकऱ्यांविषयी सहानुभूती वाटते, हे दाखवण्यासाठी महाजन शेतकऱ्यांना भेटले. ते ठोस निर्णय घेऊन ते मोर्चात सहभागी झाले असते, तर एकवेळ ठीक होते. मात्र, मदतीचे सोंग करून ते शेतकरी मोर्चात दाखल झाले. हा मोर्चा काही एका रात्रीत निघाला नाही. सरकारला एवढेच वाटत होते तर मोर्चाची तारीख जाहीर झाली तेव्हाच त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधायला होता.