घाटकोपरमध्ये शेतकऱ्यांना महिलेची मारहाण

मुंबई (हिं.स.) : निफाडवरून घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात शेतमाल विकण्यासाठी आलेले दोन शेतक-यांना एका महिलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. रमेश बनाटे आणि अनिल मधुकर केदारे असे मारहाण झालेल्या शेतक-यांची नावे आहेत.

इथे भाजी विकायची नाही. तसेच जर भाजी विकायची असेल तर पैसे मोजावे लागतील असे म्हणत या महिलेने शेतक-यांना मारहाण करत शिवीगाळ केली, असा आरोप शेतक-यांनी केला आहे. याप्रकारानंतर घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी महिला आणि शेतक-यांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे शेतक-यांना दंड भरण्यासाठी सांगितला. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे शेतक-यांना या परिसरात विक्री करू नका, अशी समजूत घालून सोडून देण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे मारहाण झालेल्या शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त करत आम्ही शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तर कुठे आणि कसा? असा प्रश्न यावेळी अनिल केदारे यांनी मांडला आहे.