शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकरारापोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रूपयाच्या अनामत रकमेतून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगार यांचीच थकीत देणी प्राधान्यक्रमाने दिली आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगार पूर्णपणे समाधानी असताना विनाकारण शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना या दोन्ही घटकांच्या हिताला बाधा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली.

आर्थिक अरिष्टात सापडलेला वसंतदादा शेतकरी साखर कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर होता. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन हा साखर कारखाना दहा वर्षे भाडेकराराने मुंबई येथील श्री दत्त इंडिया कंपनीला चालविण्यास दिला आहे. हा भाडेकरार कायदेशीर बाबी तपासूनच केला आहे. या भाडेकरारानुसार श्री दत्त इंडिया कंपनीने जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६० कोटी रूपयांची अनामत दिली आहे. या भाडेकरारात ठरल्यानुसार या रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक, ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगारांसह शासकीय देणी देण्यात आली आहेत. मात्र हा भाडेकरार संबंधित विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच झाला असतानाही शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेकडून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगार यांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही अनामत रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा असताना त्याबाबतचा निर्णय बँक प्रशासन अखत्यारित आहे.

शेतकरी व कामगार समाधानी असताना शेतकरी संघटनेने हस्तक्षेप करायची गरजच काय, असा प्रश्‍न उपस्थित करून जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने मनावर घेतले असते, तर ही संपूर्ण रक्कमच साखर कारखान्याच्या कर्जखात्याला वर्ग करून घेता आली असती. परंतु बँकेने शेतकरी व कामगार हिताला प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. या अनामत रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जापोटी केवळ ३० कोटी रूपये वर्ग करून घेतले आहेत, तर उर्वरित रकमेतून सन २०१५- १६ च्या ऊस बिलापोटी आठ कोटी ६२ लाख, सन २०१६- १७ च्या ऊस बिलापोटी चार कोटी ५५ लाख, कामगारांच्या थकीत पगारापोटी तीन कोटी ९० लाख व सांगली महापालिकेची थकित घरपट्टी १६ लाख ४२ हजार अशी एकूण ४७ कोटी ६२ लाख रूपयांची देणी दिली आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या देयकातून शेतकरी व कामगार पूर्णपणे समाधानी झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनेकडून विनाकारण आदळआपट केली जात असून साखर कारखाना चालविण्यातही जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा आरोपही दिलीप पाटील यांनी केला.