फवारणीपुर्वी शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी, कृषी विभागाकडून आवाहन

पुणे: शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांवर विविध औषधांची फवारणी केली जाते. मात्र, ही फवारनी करताना शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. पिकांवर औषध फवारणी करणाताना काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होते, तसेच नाक, त्वचा, तोंडाद्वारे किटकनाशकांचे कण शरीरात जाऊन त्यांना विषबाधा होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे फवारणीपुर्वी शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

किटकनाशकांचे चार प्रकारात वर्गीकरण होते. त्यामध्ये अति विषारी किटकनाशकाच्या डब्यावर “लाल’ रंगाचे चिन्ह असते. विषारी औषध असलेल्या डब्यावर पिवळा, मध्यम विषारी असलेल्या डब्यावर निळा तर कमी विषारी असलेल्या डब्यावर हिरव्या रंगाचे चिन्ह असते. त्यामुळे पिकांवर फवारणी करण्यापुर्वी शेतकऱ्यांनी किटक नाशकाच्या डब्यावरील माहितीपत्रक वाचून खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळ्यामुळे पिकांवर रोग पडल्यामुळे किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा. तणनाशक औषध फवारणीसाठी वापरलेला पंप किटक नाशकासाठी वापरु नये.

औषध विक्रेत्याने शिफारस केल्याप्रमाणे औषधाची मात्रा मोजून घेऊन फवारणी करण्यात यावी. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता काठीचा वापर करावा. तसेच मिश्रण पंपात भरण्यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. फवारणी करताना धुम्रपान टाळावे. तसेच फवारणी करताना नोझल बंद पडल्यास तोंडाने फुंकर मारु नये. किटकनाशकाचे रिकामे डबे नष्ट करावे. औषध फवारणीनंतर हात, पाय स्वच्छ करावे.

दरम्यान, जिल्ह्यातील 13 तालुक्‍यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी आवश्‍यक ऍप्रोन,गॉगल, टोपी, मास्कचे 10 कीट्‌सचे वाटप केले जाणार आहे. तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किट्‌सवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. किटकनाशक विक्रेत्यांनी वैध मुदतीत असणाऱ्या किटकनाशकांची विक्री करण्याची दक्षता घ्यावी. परवान्यात समाविष्ट असणाऱ्या उत्पादक कंपन्यांच्याच किटक नाशकांची विक्री करावी. औषध फवारणीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, तसेच उपलब्ध औषधामध्ये जेवढी जास्त किंमत तेवढा जास्त फरक पडतो, असे न सांगता पर्यायी स्वस्त किंमतीची औषधे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याची सूचना कृषी विभागाने औषध विक्रेत्यांना केली आहे. किटकनाशक विक्रीची पावती शेतकऱ्यांना देणे सर्वपरवानाधारक विक्रेत्यांना बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या गुण नियंत्रण विभागाने विक्रेत्यांना दिला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली आहे.