गिरीश बापट आणि विजय शिवातारेंना जबाबदार धरून शेतकऱ्याची आत्महत्या

वालचंदनगर: इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक, शेतकरी वसंत पवार यांनी गिरीश बापट आणि विजय शिवातारेंना जबाबदार धरून विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. वसंत पवार यांनी आत्महत्यापूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून त्यामध्ये जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाचा उल्लेख आहे.

पवार यांनी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये, गतवर्षी व चालू वर्षी नीरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामात पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसून पिके जळत आहेत. दोन वर्षापासुन उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नाही. तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आपल्या मित्रांनी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असाही उल्लेख वसंत पवार यांनी चिठ्ठीत केला आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहेत वसंत पवार?

शेतकरी वसंत पवार हे इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक असून त्यांचे लासुर्णेमध्ये शेती औषधे व हार्डवेअरचे दुकान आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शनिवारी पवार दुकान बंद करून घरी गेलेच नाहीत. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा दिसून आला. याप्रकरणी पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.