मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार; शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रथमोपचार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत त्यांच्यासाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यासोबतच शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहिला पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली आणि त्याच मुलाखतीचा दुसरा भाग मंगळवारी प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीमध्ये त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती, बुलेट ट्रेन, उद्योगधंदे, मराठवाड्यातील पाणीप्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की कर्जमाफी हा प्रथमोपचार आहे. आम्ही काहीही निर्णय घेतला तरी विरोधी पक्ष बोंबलत बसणार आहे. दोन लाखांपर्यंत आम्ही शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. शेतकरी त्याच्या पायावर कसा उभा राहील यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी शेतीसाठी नवे प्रयोग कसे करता येतील, कमी जागेत जास्त पीक कसं घेता येईल, ते पीक आल्यानंतर त्याला योग्य दाम किंवा योग्य भाव कसा मिळवून दिला जाईल, त्याचं मार्केटिंग कसं केलं जाईल अशी संपूर्ण चेन असायला हवी. याची आखणी करण्याची आवश्यकता असून त्याबद्दल सुद्धा निर्णय घेतले आहे असेही ते म्हणाले.

तसेच कोल्हापूर, सांगली भागात आलेल्या पुरग्रस्तांना केंद्राकडून मिळालेली मदत अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या रुपात येणारा परतावा अद्याप आला नाही. केंद्राकडून राज्याला येणाऱ्या पैशात दिरंगाई होत आहे. राज्यावर कर्जाचा बोजा मोठा असून, ते आव्हान आम्ही स्वीकारले आहे.

तसेच मराठवाड्याच्या बैठकीत पाण्याचा प्रश्न माझ्यासमोर आला. पंकजा मुंडेंना त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल मी तो मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. विदर्भातही मी अशा बैठका घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात शेतकऱ्यांचा मातोश्री बंगल्यापर्यंत मोर्चा

अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील ऑफिसेस बंद पाडू – उद्धव ठाकरे