शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा शंभर रूपये भरावे लागणार

अर्थसंकल्प

पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा शंभर रूपये भरावे लागणार आहेत. सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने तितकीच रक्कम भरणार आहे. या रक्कमेतून एलआयसीकडून पेन्शन योजना राबविली जाणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रूपयांची पेन्शन मिळणार आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी शेतकरी पेन्शन योजना जाहीर केली. या योजनेत पहिल्या तीन वर्षांत पाच कोटी शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात यावे असे त्यांचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे १० हजार ७७४ कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. या योजेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषिमंत्र्यांना केले आहे.