जमीन आरोग्य पत्रिकेच्या तपासणी प्रमाणानुसार खतांचा संतुलित वापर करावा – दादाजी भुसे

दादाजी भुसे

मालेगाव – रासायनिक खताचा वापर करत असताना शेतकरी बांधवांनी खत विक्रेत्याकडून योग्य दारातच खत विकत घ्यावे, त्याचबरोबर खताचा वापर करताना कृषी विभागामार्फत आपणास देण्यात आलेल्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या तपासणी प्रमाणानुसार तसेच कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या कृषिक अॅपचा वापर करून खताची मात्रा काढून त्याप्रमाणे खताचा योग्य वापर करावा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

शासकीय विश्रामगृहाच्या आवारात  खते व बियाणे विक्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या योजनेतंर्गत राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर कम्पनी, नाशिक यांच्यावतीने आज कुकाने येथील जय मल्हार शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष भिकन लोंढे व शेतकरी यांनी एकत्रितपणे युरियाची मागणी नोंदविली होती त्यानुसार त्यांना 200 युरिया खताच्या बॅग व 10 लिटर बायोला जैविक द्रावणाचे वाटप कृषीमंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, एम.ए.आय.डी.सी.चे क्षेत्रीय प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील, बजरंग कापसे, आर.सी.एफ.चे जिल्हा प्रभारी विशाल सोनवलकर, संजय दुसाने, आदित्य कृषी एजन्सीचे संचालक दीपक मालपुरे व शेतकरी बांधव  उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी खरिप हंगामासाठी मुबलक प्रमाणात युरिया खत शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले असले तरी शेतकरी बांधवांनी जमिनीची सुपीकता व गुणवत्ता राखण्यासाठी खतांचा नियोजनबद्ध व आवशक्यते नुसारच वापर करावा. राज्यात शेतकरी बांधवांचा रासायनिक खताचा वापर वाढत असून त्यातही युरिया सारख्या खताचा वापर वाढत आहे. मात्र रासायनिक खताची बचत करण्यासाठी विविध कंपन्यांमार्फत जैविक खते निर्मिती केली असून या खतांमध्ये जिवाणू रायझोबियम ऍझोटोबॅक्‍टर जमिनीमध्ये रासायनिक खताचे स्थिरीकरण वाढविण्याकरिता उपलब्ध करून देण्याचे काम करत असले तरी, शेतक-यांनी आपल्या जमिनीची पोत टिकविण्यासाठी  खताची मात्रा योग्य व नियोजनबध्द वापरण्याचे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी केले आहे.

तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने आजपर्यंत एकूण 198 बचत गटांमार्फत 1524 शेतकरी बांधवांना 348 मेट्रिक टन खतांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देतांना उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे म्हणाले, शेतकरी बांधवांनी जैविक खताचा वापर हा पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्याकामी करावा. तसेच लागवडीच्या वेळी पाण्यातून जैविक खताचा वापर करावा. काही ठिकाणी फवारणी मध्ये तसेच ठिबक सिंचनाद्वारे जैविक खताचा वापर करावा. युरिया सारखे लवकर पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर दोन तीन डोस मध्ये विभागून ठराविक दिवस अंतराने वापरण्याची माहिती श्री.देवरे यांनी यावेळी दिली. तर शेतकऱ्यांना काही तांत्रिक बाबींची अडचण अथवा समस्या असल्यास कृषी सहायक अथवा कृषी कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी यावेळी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –